Jalgaon Accident: राखाड डंपरची ट्रकला जोरदार धडक; भीषण अपघातात चालकाचा मृत्यू

पाळधी ते तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलामुळे सुरू असलेली एकतर्फी वाहतूक आणि दीपनगरकडून येणाऱ्या बेदरकार, ओव्हरलोड राखाड डंपरच्या मनमानीने अखेर एका निष्पाप ट्रकचालकाचा बळी घेतला.
Jalgaon Accident
Jalgaon AccidentPudhari Photo
Published on: 
Updated on: 

Jalgaon Accident​

जळगाव: पाळधी ते तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलामुळे सुरू असलेली एकतर्फी वाहतूक आणि दीपनगरकडून येणाऱ्या बेदरकार, ओव्हरलोड राखाड डंपरच्या मनमानीने अखेर एका निष्पाप ट्रकचालकाचा बळी घेतला. २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील मकर फटाके गोदामासमोर हा भीषण अपघात घडला.

चुकीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ओव्हरलोड राखाड डंपरने धान्याने भरलेल्या ट्रकला समोरासमोर दिलेल्या जोरदार धडकेत ट्रकचालक जागीच ठार झाला. अपघात इतका अंगावर काटा आणणारा होता की दोन्ही वाहनांच्या केबिनचा चेंदामेंदा होऊन डंपर थेट मधल्या चाकापर्यंत आत दाबला गेला होता. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात डंपर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Jalgaon Accident
Jalgaon News |बदनामीची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला ७ वर्षे कारावास!

शहरातील अवजड वाहतूक बाहेरून काढण्यासाठी पाळधी ते तरसोद बायपास रस्ता तयार करण्यात आलेला आहे. मात्र, गेल्या अडीच ते तीन महिन्यांपूर्वी या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा भाग खचल्याने बायपासवरील वाहतूक एकाच बाजूने सुरू ठेवण्यात आलेली आहे. २९ च्या रात्री दीपनगरकडून पाळधीच्या दिशेने क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त राख भरून जाणारा डंपर (क्रमांक एम एच 15 जेडब्ल्यू 3879) भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने निघाला होता. मकर फटाके गोदामासमोर पाळधीकडून नशिराबादकडे धान्याची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकला (क्रमांक एम एच 40 बी जी 6287) डंपरने समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी प्रचंड होती की महामार्गावर सर्वत्र राखेचे साम्राज्य पसरले आणि ट्रकमधील धान्याची पोती रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकली गेली.

क्रेन लावूनही मृतदेह काढणे झाले अवघड

अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारखेडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही वाहनांचे केबिन एकमेकांत इतके घट्ट फसले होते की, आत अडकलेल्या ट्रकचालकाला जिवंत बाहेर काढण्याचे पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले आणि चालकाने जागीच प्राण सोडले. क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहनांचे अवशेष वेगळे करताना आणि पत्रे कापून मृतदेह बाहेर काढताना पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली. या भीषण अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला.

​ओव्हरलोड राखाड वाहतुकीचा महामार्गावर उघडा माज

दीपनगर औष्णिक वीज केंद्रातून निघणारी राख वाहून नेणारे डंपर नियम, कायदे आणि नागरिकांचा जीव धाब्यावर बसवून महामार्गावरून धावत आहेत. 'ओव्हरलोड' राखाड गाड्यांवर आरटीओ आणि महामार्ग पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच या अपघाताने पुन्हा एकदा उघड केले आहे. खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष आणि रात्रीच्या वेळी चुकीच्या बाजूने सुसाट धावणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर कारवाईचा अभाव यामुळेच हा बळी गेला असून, स्थानिक नागरिकांमधून या बेपर्वा कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Jalgaon Accident
Jalgaon Burglary | जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; अडीच लाखांचा ऐवज लंपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.