

नरेंद्र पाटील, जळगाव
जळगावमधील रामानंद पोलीस ठाणे हद्दीतील व्हीआयपी वसाहत सध्या गुन्हेगारांच्या निशाण्यावर असल्याचे चित्र समोर येत आहे. या वसाहतीत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचे शासकीय बंगले तसेच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांचा रहिवासी बंगला आहे. या उच्च सुरक्षा क्षेत्रातच चोरट्यांनी खडसे यांच्या बंगल्यावर धाडसी चोरी केली असून, पोलीस यंत्रणेपुढे गंभीर आव्हान निर्माण झाले आहे
चोरट्यांनी पोलिसांची झोपच उडवली
सोमवार ( दि. 27 ) रोजी चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या शिवरामनगर येथील बंगल्यातून सुमारे सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने आणि 40 ते 45 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना ज्या भागात घडली, तिथेच जिल्हाधिकारी आणि एसपी यांचे देखील रहिवासी बंगले आहेत. त्यामुळे गस्ती पथकांच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रामानंद पोलीस स्टेशन हद्द
रामानंद पोलीस स्टेशन हद्दीतील हा परिसर शहरातील सर्वाधिक संवेदनशील भाग मानला जातो. याठिकाणी रात्रीच्या वेळी गस्ती पथक फिरतीवर तैनात असते, अशी अपेक्षा असतानाच चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या निष्काळजीपणावर चर्चेला उधाण आले आहे. राजकीय बड्या नेत्यांच्या घरीच चोरी होत असल्याने सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जर राजकीय नेत्यांच्या घरालाच सुरक्षा नाही, तर सामान्य नागरिकांचे काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने रामानंद पोलीस स्टेशनची गस्ती व्यवस्था आणि संपूर्ण कामकाजाचा आढावा घ्यावा, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी, ही केवळ चोरी नसून कायदा-सुव्यवस्थेवरील थेट आघात असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. जळगाव शहरातील सुरक्षेबाबत प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज जाणवत आहे.