

जळगाव : खामखेडा पूल आणि इंदूर रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून, त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले आहे. मुक्ताईनगर येथे अडीचशे ते तीनशे शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी संपादित झाल्या आहेत. अनेक बैठका होऊनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर शेतकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबांसह जलसमाधी आंदोलन पुकारले.
विशेष म्हणजे, या आंदोलनात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि शिवसेना (शिंदे गट) नेते चंद्रकांत पाटील स्वतः सहभागी झाले. त्यामुळे या आंदोलनाला एक वेगळं राजकीय वळण लाभल्याचं दिसून आलं. आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, सत्तेत असो की नसू – आंदोलन करणे हे माझं कर्तव्य!" असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आंदोलन स्थळी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, "शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं हे कर्तव्य आहे. जर सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल, तर आंदोलन हाच मार्ग आहे. उभ्या केळीच्या बागा कापून रस्ते काढले जात आहेत. पावसाळ्यात कोणता ठेकेदार पूलाचं काम करतो हे दाखवून द्यावं. या जमिनींवर आमच्याही घराचं पोट भरत आहे. सरकार त्याच भावाने आमचं घर किंवा शेत विकत घेईल का? महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली होती, पण प्रकल्प अधिकारी पीडी पवार हे तुघलकी कारभार करत आहेत," असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत, पण त्यापूर्वी सरकारने काम बंद करून योग्य मोबदला दिला पाहिजे. काम बंद करा, योग्य मोबदला द्या त्यानंतरच आम्ही जमीन देऊ अन्यथा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. यावेळी नॅशनल हायवे प्रशासनावरही त्यांनी टीका केली. "ते मालक असल्याप्रमाणे वागत आहेत. असा एकतर्फी कारभार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे," असे ते म्हणाले.
या आंदोलनावर विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे न्यायालयात जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील म्हणाले, "खडसे यांची भूमिका अनेकदा बदलली आहे. एका शेतकऱ्याने पैसे घेतले म्हणजे सर्वांनी घेतले असे होत नाही. येथे शंभर टक्के शेतकरी एकवटले आहेत."
शेवटी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र, मोबदल्याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे.