Jalgaon News : महिलांविरोधात अश्लील वक्तव्य करणाऱ्या विजय चौधरीच्या अटकेसाठी मुक्ताईनगरमध्ये सर्वपक्षीय 'जनआक्रोश'

प्रवर्तन चौक ते तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा; कडक कारवाई न झाल्यास तीव्र ‘रस्ता रोको’चा प्रशासनाला इशारा
Jalgaon News : महिलांविरोधात अश्लील वक्तव्य करणाऱ्या विजय चौधरीच्या अटकेसाठी मुक्ताईनगरमध्ये सर्वपक्षीय 'जनआक्रोश'
Published on
Updated on

मुक्ताईनगर (जळगाव) : विद्यमान आमदार व माजी मंत्री एकनाथ खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. हिना गावित आणि ॲड. रोहिणी खडसे यांच्याविरोधात अत्यंत गलिच्छ व अश्लील वक्तव्य करणाऱ्या विजय चौधरी याच्याविरोधात आज मुक्ताईनगरमध्ये अभूतपूर्व सर्वपक्षीय 'जनआक्रोश' मोर्चा काढण्यात आला. या विकृत वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत मुक्ताईनगरकरांनी रस्त्यावर उतरून आरोपीवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

'महिलांचा सन्मान हाच आपला स्वाभिमान' आणि 'विकृत प्रवृत्तीचा तीव्र निषेध' अशा जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण मुक्ताईनगर परिसर दुमदुमून गेला होता. प्रवर्तन चौक ते तहसील कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चात पक्ष, धर्म आणि जातीचे तट तोडून नागरिक एकवटले होते. या मोर्चात महिला, तरुण आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोठा जनसागर लोटला होता.

तहसीलदारांना निवेदन

तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन संयुक्त निवेदन दिले. यामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या. संशयित आरोपी विजय चौधरी याच्यावर 'भारतीय न्याय संहिता' (BNS) आणि 'आयटी ॲक्ट'नुसार तात्काळ बिगरजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला विनाविलंब अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सन्मानासाठी प्रशासनाने या विकृतीविरुद्ध कठोर व उदाहरणास्पद कारवाई करावी, असे निवेदानात म्हटले आहे.

प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलली नाहीत, तर मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात तीव्र लोकशाही मार्गाने 'रस्ता रोको' आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशाराही शिष्टमंडळाने यावेळी दिला.

सर्वपक्षीय 'वज्रमूठ'

या जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने मुक्ताईनगरमध्ये राजकीय मतभेद पूर्णपणे बाजूला सारल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) हे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष महिलांच्या सन्मानासाठी एकाच व्यासपीठावर एकवटले होते.

या मोर्चात भैया रवींद्र पाटील, प्रमोद पाटील (जिल्हाध्यक्ष), एस. ए. भोईसर, डॉ. जगदीश पाटील, निवृत्ती पाटील, दशरथ कांडेलकर, ईश्वर रहाणे, प्रविण कांडेलकर, राजू माळी, योगेश कोलते, विलास धायडे, डॉ. बी. सी. महाजन, शिवा पाटील, ललित महाजन, ॲड. राहुल पाटील, मनोज तळेले, लक्ष्मण सापधारे, दीपक पाटील (शिवसेना उबाठा), पंकज कोळी, बापू ससाणे, डी. के. पाटील (काँग्रेस), लताताई सावकारे, तृप्ती राणे, सुनीता भालेराव, मनीषा जावरे, अरुणा पवार, सुधाकर बोदडे (RPI), बुलेस्टीनी भोसले, आबा पाटील, सागर पाटील यांच्यासह तालुक्यातील सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news