

जळगाव : महसूल दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महसूल विभागातील कार्यपद्धतीवर थेट सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांचे कान टोचले. तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयांना विभागीय स्तरावर स्थगिती दिली जाते, मग नागरिकांना का फिरवले जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
एक ऑगस्टपासून महसूल सप्ताहाला सुरुवात झाली असून, या निमित्ताने जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, "एकाच प्रकरणाचा निकाल तहसीलदार देतो आणि त्याच प्रकरणात फेरतपासणी व स्थगिती विभागीय कार्यालयाकडून का दिली जाते, हे समजत नाही. नागरिकांना का फिरवलं जातं?" असा सवाल उपस्थित करत महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली.
तलाठी आणि ग्रामसेवकांबद्दल बोलताना ते म्हणाले, "गावात तलाठी आणि ग्रामसेवक यांना लोक 'आप्पा' म्हणतात. त्यांच्यावर लोकांचा विश्वास असतो. एखादा तलाठी दुखावला, तर तो १००-२०० मते उलथवू शकतो."
गिरीश महाजन यांची स्तुती करत पाटील म्हणाले, "सगळ्या पक्षांना सांभाळणं गिरीशभाऊंना जमतं, आम्हाला नाही. ते दिसायलाही हिरो आहेत, आम्ही काळे बेंद्रे आहोत. सध्या त्यांचंच दुकान चालतंय, आम्ही फक्त बघतो."
आपली राजकीय कारकीर्द सांगताना ते म्हणाले, "७० टक्के आयुष्य मोर्चे काढण्यात, गाड्या अडवण्यात, फोडण्यात गेलं. तोच आमचा धंदा होता. आता पार्टनरशिपमध्ये सत्तेत आलोय, पण हे लोक कधी गुवाहाटीला तर कधी कुठेही घेऊन जातात."
जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुक करत ते म्हणाले, एका महिलेची रस्त्यावर प्रसूती झाली तेव्हा संपूर्ण जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले. अशा संवेदनशीलतेबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. सत्कारात मोठी ताकद असते. अशाच सत्कारांतून मी मोठा झालो. भाषणांत बक्षीस मिळालं नसतं, तर मी इतकं चांगलं बोलू शकलो नसतो असेही ते म्हणाले.