

Mobile Phones in Polling Booth Jalgaon
जळगाव : 'मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल बंदी', 'कडक तपासणी', 'पोलिसांचा बंदोबस्त'... प्रशासनाच्या या सर्व वल्गनांचा जळगाव महापालिका निवडणुकीत आज अक्षरशः फज्जा उडाला. एमआयडीसी भागातील मेहरुण आणि आर. आर. विद्यालय या संवेदनशील केंद्रांवर चक्क मोबाईलचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे, कारण भाजपचे उमेदवार आणि माजी महापौर नितीन लड्डा हे चक्क मतदान केंद्र परिसरात मोबाईलवर बोलत आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरातील प्रभाग क्रमांक १७ जी मधील मणियार प्राथमिक विद्यालय येथे सकाळपासूनच नियमांची 'ऐशीतैशी' सुरू होती. आयोगाच्या स्पष्ट सूचना असतानाही अनेक मतदार मतदान केंद्रात मोबाईल घेऊन बिनदिक्कत वावरताना दिसले. पोलीस प्रशासन आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत, त्यांच्या नाकावर टिचून मोबाईलचा हा वापर सुरू होता, तरीही यंत्रणा मात्र 'अळीमिळी गुपचिळी' साधून बसली होती.
दुसरीकडे, आर. आर. विद्यालय येथे आधीच बोगस मतदानाच्या आरोपावरून वातावरण तापलेले असताना, तिथे वेगळाच प्रकार समोर आला. प्रशासनाने १०० मीटरच्या आत मोबाईल जमा करण्याची सक्ती केली असताना, भाजप उमेदवार नितीन लड्डा हे चक्क मतदान केंद्राच्या आवारात मोबाईलवर बोलताना दिसून आले. "सर्वसामान्य मतदाराला गेटवरच अडवणारे पोलीस, पुढाऱ्यांना मात्र रेड कार्पेट देतात का?" असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचा 'भोंगळ' कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षिततेसाठी मोबाईल बंदीचा नियम केला आहे. मात्र, जळगावात उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते उघडपणे मोबाईल घेऊन फिरत असताना पोलीस आणि निवडणूक अधिकारी काय करत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लड्डांच्या या 'मोबाईल संवादा'वर निवडणूक आयोग काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.