Jalgaon Municipal Council Elections : 18 नगराध्यक्ष आणि 464 सदस्य; उद्या निकाल
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर व काही प्रभागासाठी. 20 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी ६५.५८ टक्के मतदान झाले असून, आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. जिल्ह्यातील एकूण ८ लाख ८१ हजार ५०८ मतदारांपैकी ५ लाख ७८ हजार ०६९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १८ नगराध्यक्ष आणि ४६४ सदस्य याचा फैसला रविवार (दि.21) रोजी होणार आहे.
एरंडोलमध्ये सर्वाधिक, तर भुसावळमध्ये सर्वात कमी मतदान
प्राप्त आकडेवारीनुसार, एरंडोल नगरपरिषदेत जिल्ह्यात सर्वाधिक ७५.४९ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल रावेर (७४.७४ टक्के) आणि यावल (७३.१६ टक्के) यांचा क्रमांक लागतो आहे. दुसरीकडे, सर्वात मोठी नगरपरिषद असलेल्या भुसावळमध्ये सर्वात कमी म्हणजे ५५ टक्के इतकेच मतदान झाले आहे.
मतमोजणीसाठी तयारी : १६० पथके सज्ज
प्रशासनाने मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली असून जिल्ह्यात एकूण १६० पथके नेमण्यात आली आहेत. मतमोजणीची प्रक्रिया एकूण ११६ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. यामध्ये भुसावळमध्ये सर्वाधिक १५ फेऱ्या, तर धरणगाव आणि रावेरमध्ये सर्वात कमी २ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे
निवडणुकीची सांख्यिकी एका दृष्टिक्षेपात:
एकूण नगरपरिषद/पंचायती: १८
एकूण मतदान केंद्र संख्या: ९७७
प्राप्त टपाली मतपत्रिका: १५९०
एकूण सी.यू. (CU) संख्या: १०२४
महत्त्वाच्या शहरांमधील मतदानाची टक्केवारी:
अमळनेर ६४.४८
चाळीसगाव ६२.५८
चोपडा. ६७.९७
पाचोरा ६८.८२
जामनेर ६०.६८
निवडणुकीत १८ नगराध्यक्ष आणि ४६४ सदस्य पदांचे भवितव्य आता मतदान यंत्रांत (EVM) बंद झाले आहे. प्रशासनाने मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त तैनात केला असून लवकरच जिल्ह्याचे स्थानिक राजकारण कोणत्या दिशेला जाणार, याचा फैसला होणार आहे.

