Jalgaon mayor news| महापौर भाजपचाच, पण दावेदार अनेक! निवडणुकीआधीच जळगाव मनपात रणांगण; 'महायुती'कडून १२ अर्जांचा 'विळखा'

उपमहापौर शिवसेनेचा होणार हे सूत्र ठरले; २ फेब्रुवारीच्या अर्जांकडे जळगावच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष!
Jalgaon mayor news
Jalgaon mayor news
Published on
Updated on

जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या खुर्चीसाठी राजकीय हालचालींनी आता वेग घेतला आहे. शुक्रवारी (दि.३० जानेवारी) भाजप आणि शिवसेनेने अर्जांचा पाऊस पाडला आहे. 'महायुती'चे संख्याबळ ७० वर पोहोचल्याने सत्ता मिळवणे ही केवळ औपचारिकता उरली असली, तरी पक्षांतर्गत इच्छुकांची गर्दी पाहता भाजपने महापौरपदासाठी ६ आणि उपमहापौरपदासाठी ६ असे एकूण १२ अर्ज ताब्यात घेतले आहेत. यामुळे आता भाजप कोणाला संधी देते आणि कोणाचा पत्ता कट होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजपच्या गोटात मोठी हालचाल!

गेल्या दोन दिवसांपासून शांतता असलेल्या मनपा आवारात शुक्रवारी अचानक राजकीय खलबते वाढली. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास भाजपचे शहर सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली गटनेते प्रकाश बालाणी, उप गटनेते नितीन बरडे आणि प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी नगर सचिव सतीश शुक्ला यांच्याकडून अर्जांचा संच घेतला. यामध्ये:

प्रकाश बालाणी: महापौरपदासाठी ४ अर्ज.

नितीन बरडे: उपमहापौरपदासाठी ४ अर्ज.

डॉ. चंद्रशेखर पाटील: महापौर २ आणि उपमहापौर २ असे एकूण ४ अर्ज.

अशा प्रकारे महायुतीने एकूण १२ अर्जांची 'घेराबंदी' केली असून, यामुळे इच्छुकांची धडधड वाढली आहे.

महायुतीचे ७० चे 'बळ'

जळगाव मनपा निवडणुकीत भाजपने ४६ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाच्या २२ जागा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि अपक्षांची साथ मिळाल्याने महायुतीचे पारडे ७० मतांसह जड झाले आहे. ठरलेल्या सूत्रानुसार, महापौरपद भाजपच्या वाट्याला तर उपमहापौरपद शिवसेनेच्या (शिंदे गट) पदरात पडणार आहे. शिवसेनेनेही आज उपमहापौरपदासाठी आपले अर्ज घेतल्याने युतीमधील समन्वय स्पष्ट झाला आहे.

आता लक्ष २ फेब्रुवारीकडे!

अर्जांचा संच ताब्यात घेतला असला, तरी प्रत्यक्ष अर्ज कोण भरणार आणि पक्षाचा 'एबी फॉर्म' कोणाच्या नशिबात असणार, याचा फैसला २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. जळगावचा पुढचा 'कारभारी' कोण ठरेल, याचा अंतिम निकाल ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडीत स्पष्ट होईल. सध्या तरी जळगाव मनपात 'महायुती'चाच झेंडा फडकणार हे निश्चित मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news