

Jalgaon Municipal Corporation
जळगाव : जळगाव महानगरपालिकेत अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कारवाईनंतर अवघ्या काही दिवसांमध्ये अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी पुन्हा दुकाने थाटली गेली. त्यामुळे महापौरांच्या आदेशानंतरही नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर प्रशासन मेहेरबान असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौजफाटा सोबत घेत भंगार बाजारावर धडक कारवाई केली होती. सकाळी सुरू झालेली ही मोहीम दुपारी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून आदेश येईपर्यंत सुरू होती आणि या दरम्यान अनेक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
मात्र, सोमवारी या ठिकाणी पुन्हा एकदा परिस्थिती 'जैसे थे' झाली आहे. पाडलेल्या दुकानांच्या जागेवर काहींनी पुन्हा बस्तान बसवले आहे, तर एका दुकानदाराने तर थेट रस्त्यावरच दुकान थाटून "सदरचा माल गोडाऊनमधून मिळेल" असा भलामोठा बॅनर लावून प्रशासनाला उघड आव्हान दिले आहे. अतिक्रमण विभागाचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
एकीकडे अतिक्रमण विभाग सर्वसामान्य विक्रेत्यांचे आणि लहान कार्यकर्त्यांचे बॅनर काढण्याची तत्परता दाखवत असताना, शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या अजिंठा चौफुली येथील मुख्य सर्कलमध्येच सत्काराचे मोठमोठे बॅनर झळकत आहेत. भरचौकात वाहतुकीला अडथळा ठरणारे हे बॅनर अतिक्रमण विभागाच्या नजरेस का पडत नाहीत, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
या संदर्भात अतिक्रमण विभागाचे अधिकारी संजय ठाकूर यांची भेट घेऊन विचारणा केली असता, "संबंधितांना बॅनर लावण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, मात्र ती नियमांच्या अधीन राहून ठरलेल्या ठिकाणी लावण्याची आहे, भररस्त्यात किंवा चौकात लावण्याची नाही," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
परवानगीचे उल्लंघन करून भरचौकात बॅनर लावले गेले आहेत, तर अतिक्रमण विभाग त्यावर अद्याप दंडात्मक कारवाई का करत नाही? की कायद्याचे सर्व नियम हे केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत? असे प्रश्न आता जळगावकरांकडून विचारले जात आहेत.