Jalgaon Bribe | वीज चोरीच्या कारवाईची भीती दाखवून १५ हजारांची लाच; महावितरणचे तीन कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात

४० हजारांची केली होती मागणी; पांडे चौकात सहाय्यक अभियंता रंगेहाथ, दोन वरिष्ठ तंत्रज्ञांनाही अटक
 Bribe Case
प्रातिनिधीक फोटो (File Photo)
Published on: 
Updated on: 

Mahavitaran Bribery Case

जळगाव : वीज चोरी केल्याचा आरोप करून कारवाईची भीती दाखवत नागरिकाकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. तडजोडीनंतर १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक अभियंता विशाल वसंत नेमाडे याला पांडे चौकात रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात दोन वरिष्ठ तंत्रज्ञांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई १४ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक अभियंता विशाल वसंत नेमाडे (३७, रा. योगेश्वर नगर, जळगाव), वरिष्ठ तंत्रज्ञ भरत कडू तायडे (४५, रा. न्यू लक्ष्मीनगर, सावखेडा शिवार) आणि वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र छन्नू पाटील (४१, रा. पंडित कॉर्नर अपार्टमेंट, जळगाव, मूळ रा. झुरखेडा, ता. धरणगाव) यांचा समावेश आहे. हे तिघेही महावितरणच्या जळगाव शहर महसूल व देयक उपविभागात कार्यरत आहेत.

 Bribe Case
Jalgaon Tribal Welfare News | आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; जळगावमध्ये जनजातीय गौरव सप्ताह

जळगाव शहरातील एका ४० वर्षीय नागरिकाच्या घरी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास या तिघांनी भेट दिली. घरात नव्याने बसवलेल्या वीज मीटरची तपासणी करून मीटर आणि विद्युत उपकरणांचे छायाचित्र घेतले. त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ भरत तायडे याने तक्रारदाराला फोन करून पांडे चौकात बोलावले. तेथे तिघांनी घरातील उपकरणांचा वीजभार अधिक असल्याचे सांगत सर्व्हिस वायर बायपास करून वीज चोरी केली जात असल्याचा आरोप केला. या प्रकरणात कारवाई आणि गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी ४० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.

तडजोडीनंतर १५ हजारांची मागणी

लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार पंचांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी भरत तायडे आणि रवींद्र पाटील यांनी स्वतःसह सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे याच्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यानंतर एसीबीच्या पथकाने पांडे चौकात सापळा रचला. तक्रारदार पैसे देण्यासाठी पोहोचले असता भरत तायडे याने लाचेची रक्कम सहाय्यक अभियंता नेमाडे याच्याकडे देण्यास सांगितले. नेमाडे याने १५ हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईत कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून भरत तायडे आणि रवींद्र पाटील यांनाही ताब्यात घेण्यात आले.

 Bribe Case
Jalgaon News : ‘अदृश्य शक्ती’ कोण? वेळ आल्यावर हिशोब चुकता करणार; सुमित पाटलांचा अर्ज बाद ठरवल्याने आ. किशोर पाटील यांचा इशारा

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा

या प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणात ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, हवालदार बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि मनोज पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन जळगाव एसीबीने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.