

Muktainagar Ruikheda farmer death
जळगाव: मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथे शेतात काम करत असताना जमिनीवर पडलेल्या इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून ४१ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव एकनाथ जगन्नाथ कांदले (वय ४१) असून, ते रुईखेडा येथील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मृत एकनाथ कांदले यांच्या भावाने पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ कांदले हे बटाईने केलेल्या शेतात काम करत होते. त्यावेळी जमिनीवर पडलेल्या बेवारस इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. संजय पवार पुढील तपास करत आहेत.