

Muktainagar Police Armed Robbers Arrested
जळगाव : मुक्ताईनगर पोलीस ठाणे हद्दीत पहाटे बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलावर एका वाहनाचा किरकोळ अपघात झाला. त्यावेळी परिसरात गस्त घालत असलेल्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या सेकंड मोबाईल पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना पाहताच वाहन चालकासह दोन जण घटनास्थळावरून पळून गेले. वाहनातील अन्य दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी त्यांच्या हालचालींबाबत समाधानकारक माहिती दिली नाही.
वाहनाची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, एक दोरी, लोखंडी रॉड, दोन मोबाईल फोन तसेच एक बनावट क्रमांक प्लेट जप्त करण्यात आली.
तपासादरम्यान फरार झालेला वाहन चालक प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध बीड, अहमदनगर, बुलढाणा, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये सुमारे १८ गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर यापूर्वी एमपीडीए अंतर्गत कारवाई होऊन त्यास बीड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून अटक आरोपींकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी चंद्रकांत विष्णू वाघ आणि कैलास कारभारी घोडके या आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.