

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ३१ हजार ९०८ पात्र शेतकरी कर्जधारकांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६' अंतर्गत जिल्ह्यातील 31908 शेतकऱ्याच्या खात्यावर तब्बल १८४.१६ कोटी रुपयांचा निधी शुक्रवारी ७ रोजी संबंधित बँकांच्या पूल अकाऊंटवर जमा झाला आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते या प्रक्रियेचा शुभारंभ झाल्याने जिल्ह्यातील थकबाकीदार बळीराज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे नोंदणी झालेल्या ८७ हजार ८२६ खात्यांपैकी ६५ हजार ३४३ शेतकरी पात्र ठरले आहेत. यातील २५ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीतील ५० हजार ५१५ शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण पूर्ण झाले असून, त्यापैकी जळगाव जिल्ह्यामधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँक 31 हजार 908 लाभार्थ्यांच्या खात्यांवर 184.16 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आलेला आहे.उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण होताच त्यांच्याही खात्यावर लाभाची रक्कम त्वरित वळती केली जाणार आहे.
खरीप पीक कर्जाचा मार्ग मोकळा
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही विलंबाशिवाय तातडीने खरीप पीक कर्ज वाटप करण्याचे सक्त निर्देश शासनाने सर्व बँकांना दिले आहेत. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची 'अॅग्रीस्टॅक' नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांच्यासाठी १० ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली असून, जिल्ह्यात गावोगावी कॅम्प लावण्याचे नियोजन केले जात आहे. प्रशासनाच्या या धडक भूमिकेमुळे रखडलेली कामे मार्गी लागून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक महेश गायकवाड यांनी दिली.
दरम्यान 50 हजार शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण झालेली आहे. यामध्ये नॅशनल व जीडीसीसी बँकेमधील खातेदारांच्या काही नॉर्मल चूक आहे ते अजून सुधारित झाल्याने त्यामुळे त्यांचे खाते रक्कम जमा झालेली नाही. या कर्जमाफीमध्ये 31 हजार शेतकऱ्यांपैकी 27000 जिल्हा बँकेचे शेतकरी आहेत