

Mahavitran corruption case
जळगाव: महावितरणच्या जळगाव शहर उपविभाग १ मध्ये कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम धना लोंढे (वय ५७, वर्ग ३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. १५) २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
तक्रारीनुसार, व्यवसायाने डॉक्टर असलेल्या तक्रारदारांना त्यांच्या मुलाच्या नावावर नवीन वीज मीटर बसवायचे होते. त्यांनी या कामासाठी आरोपी लोंढे यांची भेट घेतली होती. सुरुवातीला लोंढे यांनी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ४ हजार रुपयांची मागणी केली होती आणि तक्रारदारांनी ती रक्कम दिली होती. मात्र, कामात विलंब होत राहिला आणि लोंढे यांनी पुढे आणखी २ हजार रुपये देण्याची मागणी केली.
वारंवार होणाऱ्या लाचेच्या मागण्यांमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदारांनी १५ डिसेंबर रोजी जळगाव पथकातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. यावरून विभागाने सापळा रचून आरोपीला तक्रारदाराच्या मुलासाठी नवीन वीज मीटर बसवण्याच्या मोबदल्यात २ हजारांची लाच स्वीकारताना पकडले.
या यशस्वी कारवाईनंतर, आरोपी वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम धना लोंढे यांच्याविरुद्ध जळगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस अधिकारी सचिन चाटे आणि पोलीस अधिकारी अमोल सुर्यवंशी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.