

जळगाव : शहरातील एमआयडीसी परिसरातील के-सेक्टरमध्ये असलेल्या साई किसान ठिबक निर्मिती कंपनीला बुधवारी (दि.10) रोजी रात्री सुमारे नऊ वाजता अचानक भीषण आग लागली. काही मिनिटांत या आगीने वेग पकडत संपूर्ण कंपनीला कवेत घेतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सहा बंब त्वरेने घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि त्यांनी अथक प्रयत्नांनंतर रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणली.
आग लागली यावेळी कंपनीत अंदाजे 20 ते 25 कर्मचारी उपस्थित होते. मात्र सर्वांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात आले. कोट्यवधी रुपयांचे ठिबक सिंचनाचे साहित्य भीषण आगीत जळून खाक झाले आहेत.
कंपनीलगत असलेल्या ट्रान्सफॉर्मरची मंगळवारी (दि.9) रोजी बदली करण्यात आली होती. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक भगवान आव्हाड आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले. आगीचे अचूक कारण आणि एकूण नुकसानाचा तपशील पुढील चौकशीनंतर निश्चित होणार आहे.