Jalgaon News : ‘अदृश्य शक्ती’ कोण? वेळ आल्यावर हिशोब चुकता करणार; सुमित पाटलांचा अर्ज बाद ठरवल्याने आ. किशोर पाटील यांचा इशारा

मुलाचा अर्ज बाद ठरवल्याने आमदार किशोर पाटील यांची तोफ; सहकार निवडणुकीवरून जळगावच्या राजकारणात खळबळ
Jalgaon News : ‘अदृश्य शक्ती’ कोण? वेळ आल्यावर हिशोब चुकता करणार; सुमित पाटलांचा अर्ज बाद ठरवल्याने आ. किशोर पाटील यांचा इशारा
Published on: 
Updated on: 

जळगाव : संस्थेच्या निवडणुकीत मुलगा सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) यांनी नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे बाद ठरवल्याचा घणाघाती आरोप शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी केला आहे. “या बेकायदेशीर खेळीमागे नक्कीच ‘अदृश्य शक्ती’चा हात असून योग्य वेळ आल्यावर त्या अदृश्य शक्तीचे नाव जाहीर करून हिशोब चुकता करू,” असा थेट इशारा देत आ. पाटील यांनी सहकार आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी सहनिबंधकांपासून ते गरज पडल्यास उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

सोमवारी (दि. ९) आयोजित पत्रकार परिषदेत आ. किशोर पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहकार विभागाच्या संशयास्पद कार्यपद्धतीची लक्तरे वेशीवर टांगली. “माझ्या २५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. सुमितच्या अर्जात कोणतीही तांत्रिक त्रुटी नव्हती, सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच अर्ज दाखल करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अर्जाबाहेर जाऊन निर्णय घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. मग डीडीआर यांनी कोणत्या अधिकारात लेखापरीक्षकाला (ऑडिटर) पत्र दिले आणि अधिकाऱ्याने कोणत्या तरतुदीखाली ‘फॉर्म उडवला’? कायद्यात तरतूद नसताना हा मनमानी कारभार झाल्यामुळेच सुमितने ‘अदृश्य शक्ती’चा उल्लेख केला होता,” असा घणाघात त्यांनी केला. सध्या हे प्रकरण सहनिबंधकांकडे (जॉइंट रजिस्ट्रार) न्यायप्रविष्ट असल्याने १७ तारखेपर्यंत (अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत) संयम बाळगणार असल्याचे सांगत, “आमचे दरवाजे उघडे आहेत, आम्ही कोणाच्या दबावाला भीक घालत नाही. ज्या दिवशी निकाल समोर येईल, त्या दिवशी थेट नाव घेऊनच बोलेन,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

‘१० मते मिळवून दाखवा, सुमितचा राजीनामा देतो!’

प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात पराभूत करणे शक्य नसल्यानेच विरोधकांनी ही कटकारस्थाने सुरू केल्याचा आरोप करत आ. पाटील यांनी विरोधकांना उघडे पाडले. “विरोधकांचे सूचक-अनुमोदक हे दिलीपभाऊ वाघ यांचे कार्यकर्ते असून तेही माझ्या संपर्कात आहेत. एकूण ७९ पैकी ७५ मतदार कालच माझ्यासोबत दिवाळी फराळाला उपस्थित होते. केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच ही उमेदवारी उभी करण्यात आली आहे. जर विरोधकांनी थेट निवडणूक लढवून दाखवली आणि त्यांना १० पेक्षा अधिक मते मिळाली, तर मी सुमितचा तात्काळ राजीनामा मिळवून देईन,” असे खणखणीत आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.

‘शिवसेनेला समान वाटा हवाच’

महायुतीबाबत बोलताना आ. पाटील यांनी जागावाटपाचा स्पष्ट फॉर्म्युला मांडला. ना. गिरीश महाजन आणि ना. गुलाबराव पाटील यांनी युतीचे संकेत दिले असून १७ तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले, “संस्थेत शिवसेना आणि भाजपला समान जागा देऊन उर्वरित जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात. चेअरमन पदाबाबत योग्य तोडगा निघावा आणि व्हाईस चेअरमन पद तिन्ही पक्षांना प्रत्येकी एक-एक वर्ष वाटून देण्यात यावे. युतीत शिवसेनेला सन्मानजनक वाटा मिळालाच पाहिजे.”

जिल्ह्यातील राजकीय ताकदीचा दाखला देताना ते म्हणाले, “जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना या दोघांचेही प्रत्येकी ५ आमदार आहेत. मात्र, शिवसेनेचे पाचही आमदार पूर्णपणे ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतात. आमच्या प्रत्येक आमदाराकडे दोन-दोन तालुके आहेत—माझ्याकडे पाचोरा-भडगाव, अमोल पाटलांकडे एरंडोल-पारोळा, चंद्रकांत पाटलांकडे मुक्ताईनगर-बोदवड, गुलाबराव पाटलांकडे जळगाव-धरणगाव, तर चंदूअण्णांकडे चोपडा-यावल अशी भक्कम संस्थात्मक ताकद आहे. त्या तुलनेत भाजप आमदारांकडे प्रत्येकी एकच तालुका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ताकदीनुसार शिवसेनेचा सन्मानजनक जागांवर रास्त हक्क आहे.” तसेच, पाचोऱ्यातील स्थानिक वाद मूळ विचारधारेच्या प्रामाणिक भाजप कार्यकर्त्यांशी नसून पक्षाशी संबंध नसलेल्या काही मोजक्या व्यक्तींशी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

दुष्काळात राजकारण नको; गिरणातून दोन आवर्तने सोडा

राजकीय संघर्षासोबतच दुष्काळी परिस्थितीवर बोलताना आ. किशोर पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “एल निनोच्या संकटामुळे खरिपाचे ६० टक्के नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरिबांना तीन दिवस स्वतः उपस्थित राहून दिवाळी शिधा वाटप करणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

तसेच, पाणीवाटप समितीने भडगाव-पाचोऱ्यासाठी घेतलेला केवळ एका आवर्तनाचा निर्णय अपुरा असून, रब्बी हंगाम आणि जनावरांचा चारा वाचवण्यासाठी गिरणा धरणातून किमान दोन आवर्तने सोडणे अत्यावश्यक आहे. पाणी अडवून ठेवल्यास ते बाष्पीभवनामुळे वाया जाईल. याप्रश्नी १८ तारखेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागासोबत तातडीने फेरबैठक घेऊन दोन आवर्तनांचा निर्णय मंजूर करून घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. संभाव्य ‘सुपर एल निनो’चा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.