

जळगाव (यावल) – यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात दोन वर्षांच्या चिमुरडीचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या तातडीच्या कारवाईत जेरबंद करण्यात यश आले आहे.
गरुवार (दि.17) रोजी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान, प्रभाकर चौधरी यांच्या शेतात झोपलेली रत्नाबाई सतीश ठेलारी (वय २) हिला बिबट्याने उचलून केळीच्या बागेत नेले आणि ठार केले. ही मागील महिन्यातील दुसरी घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) समाधान पाटील यांच्या नेतृत्वात यावल पश्चिमचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, यावल पूर्वचे स्वप्निल फटांगरे आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला.
बिबट्याच्या अधिवास आढळणाऱ्या या भागात चार पिंजरे लावण्यात आले होते. मानद वन्यजीव रक्षक रविंद्र फाळक, अमन गुजर यांच्या सहकार्याने डॉ. यश सागर (पशुवैद्यकीय अधिकारी, TTC जळगाव) आणि वनपाल गणेश गवळी (शूटर) यांची याकामी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवार (दि.17) रोजी रात्री ९ वाजता बिबट्या पिंजऱ्याजवळ दिसताच, वनपाल गणेश गवळी यांनी अचूक निशाणा साधून बेशुद्धीचे इंजेक्शन टोचले. ड्रोनच्या सहाय्याने शोध घेतल्यानंतर, बिबट्या काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत गवतात आढळून आला आणि त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश आले आहे. बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठवले जाणार आहे.
"नागरिकांनी अशा घटनांमध्ये वनविभागास सहकार्य करावे, त्यामुळे कारवाई यशस्वी होते," असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी यावेळी केले आहे.