Jalgaon Leopard News | बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिका ठार

बिबट्याच्या हल्ल्यात दुसऱ्या बळीमुळे परिसरात भीतीचं वातावरण; मादी बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण
Leopard News
बिबट्याची दहशतfile photo
Published on
Updated on

जळगाव : यावल तालुक्यात काही दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना बुधवार (दि.16) रोजी डांभुर्णी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका बालिकेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत बालिका मेंढपाळ कुटुंबातील असून, वन विभागाने तातडीने नाशिक येथून रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे.

यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील गट क्रमांक 741 मधील शेतशिवारात मेंढपाळांची तीन कुटुंबे मागील पाच दिवसांपासून वास्तव्यास आहेत. बुधवार (दि.16) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रत्नाबाई रूपनर (वय 2 वर्षे) ही चिमुकली आपल्या आई जिजाबाई रूपनर हिच्यासोबत झोपलेली असताना बिबट्याने तिच्यावर झडप घालत तिला अलगद उचलून नेले तेवढ्यात चिमुरडीला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी आईचा जीव कासावीस झाला. आईच्या आरडाओरडीनंतरही अंधाराचा फायदा घेत बिबट्याने केळीच्या बागेत धूम ठोकली. बालिकेचा शोध घेतला असता काही अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अवस्थेवरून बिबट्याने तिला फरफटत नेऊन ठार केल्याने बालिकेच्या आईने टाहो फोडला.

प्रशासनाची तातडीने दखल घ्यावी

घटनेची माहिती मिळताच रात्री 1 वाजेच्या सुमारास वन अधिकारी विपुल पाटील, पश्चिम विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्यासह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर आणि त्यांचे सहकारीही तत्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाने घटनेची तातडीने दखल घेवून परिसरात तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसा वीज नसल्याने रात्री शिवारात जाणे भाग पडत आहे. त्यात बिबट्याची दहशत वाढल्यामुळे स्थानिक संतप्त झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली असून, तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

नाशिक येथून विशेष रेस्क्यू टीम पाचारण

या घटनेपूर्वी किनगाव नजीक देखील बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला होता. आता दुसऱ्यांदा बालकाचा बळी गेल्याने या नरभक्षक बिबट्याला पकडण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत यावल वन विभागाचे डीएफओ जमीर शेख यांनी सांगितले की, दोन्ही घटनांमध्ये सुमारे 9 किमीचे अंतर असून, हा नरभक्षक बिबट्या मादी आहे. तिला पकडण्यासाठी नाशिक येथून विशेष रेस्क्यू टीम पाचारण करण्यात आली आहे. आवश्यक परवानग्या घेतल्या असून, परिसरात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर तिला नागपूर (चिडीया घर) मध्ये हलवण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news