

Jamner Panchayat Samiti Bribery Case
जळगाव : शासनाच्या सिंचन विहीर योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामाचे पुढील अनुदान मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पंचायत समिती जामनेर येथील तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी) सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जळगाव पथकाने केलेल्या पडताळणीत लाच मागणी स्पष्ट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. .
तक्रारदाराच्या जामनेर शिवारातील शेतासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२१-२२ व २०२२-२३ या कालावधीत सिंचन विहीर मंजूर झाली होती. विहिरीच्या स्थळपाहणी पूर्वीच सागर नावकर यांनी गावातील रोजगार सेवका मार्फत ३० हजार रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर तक्रारदारास विविध टप्प्यांत ६० हजार ९६६ रुपये अनुदान मिळाले होते.
उर्वरित अनुदानासाठी तक्रारदाराने नावकर यांची भेट घेतली असता, विहिरीचे ठिकाण बदलल्याचे कारण देत पुढील अनुदान मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर तक्रारदाराने ६ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या अनुषंगाने ६ एप्रिल, ९ एप्रिल आणि १४ मे २०२६ रोजी लाचमागणी पडताळणी कारवाई करण्यात आली. पडताळणीदरम्यान पंचासमक्ष तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या प्रकरणाचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. तर कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर करीत आहेत.