

Jamner Flood Risk
जळगाव : जामनेर तालुक्यातील काग (कांग) नदीवरील पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले असून, ऐन पावसाळ्यात जामनेर शहराचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हा पुल मंत्री गिरीश महाजनांच्या घरापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर आहे.
पावसाळ्यात काग (कांग) नदीवरील लहान पुलावरून पाणी वाहू लागल्यास पाण्याचा निचरा होईपर्यंत जामनेर शहराचे थेट दोन भागांत विभाजन होते. यामुळे मुख्य शासकीय कार्यालये, बस स्थानक आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांशी नागरिकांचा संपर्क पुरता तुटतो. या नदीवर १०५ मीटर लांबीचा नवीन पुल बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, दोन वर्षांनंतरही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.
आतापर्यंत 70 टक्केच काम पूर्ण झाले असून, पुलाच्या दोन्ही बाजूंचे भरावाचे काम आणि भुसावळकडून जामनेरकडे येणाऱ्या स्लॅबचे काम अजूनही लटकलेले आहे. या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (जामनेर) अभियंता सुरेश चारुसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी "काम सुरू असून मार्च २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होईल," असे उत्तर दिले