

जळगाव : हतनूर धरणक्षेत्रातील पाणीपातळीत वाढ झाल्याने तापी-पूर्णा नदीकिनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तापी व पुर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत ४२९ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने हतनूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.१९) धरणाचे २४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून, त्यापैकी ६ गेट प्रत्येकी १ मीटरने उघडण्यात आल्याची माहिती धरण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
धरण दरवाजांमधून १,७५,५५१ क्युसेस (४९७१ क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी व पुर्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. धरणातील सध्याची पाण्याची पातळी २११.४९ मीटर असून, साठा ६६.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
धरण क्षेत्रातील टेक्सा (१२४.४ मि.मी.), देढतलाई (९२.६ मि.मी.), लखपुरी (५२ मि.मी.), गोपालखेडा (४९.४ मि.मी.) यांसह इतर केंद्रांवर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.