Jalgaon Illegal Sand Mining | गिरणा नदीपात्रात मोठी कारवाई; अवैध वाळू उपशावर हातोडा; ३ कोटी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाचोरा तालुक्यातील कुरंगी शिवारातील गिरणा नदीपात्रात धाड
Girna River Illegal Sand Mining
Girna River Illegal Sand Mining Pudhari
Published on
Updated on

Girna River Illegal Sand Mining

जळगाव : गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल, पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त कारवाई करत मोठा दणका दिला. पाचोरा तालुक्यातील कुरंगी शिवारातील गिरणा नदीपात्रात गुरुवारी (दि. १८) पहाटे पाचच्या सुमारास अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीत वापरली जाणारी तब्बल २९ वाहने जप्त करण्यात आली असून, सुमारे ३ कोटी ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

गिरणा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी पोकलेन, जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बंसोडे, जळगाव व भडगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच पहूर, बोदवड आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकाने कुरंगी शिवारात पहाटे अचानक धडक कारवाई केली.

Girna River Illegal Sand Mining
Jalgaon Rain | जळगाव जिल्ह्यात पावसाची ओढ; सरासरीच्या केवळ ४२.२ टक्के पाऊस

पथकाने नदीपात्राला वेढा घालून वाळू उपसा सुरू असतानाच कारवाई केली. यावेळी एक पोकलेन, सहा अवजड हायवा, २१ हून अधिक ट्रॅक्टर-ट्रॉली आणि इतर वाहने, अशी एकूण २९ वाहने ताब्यात घेण्यात आली.

महसूल-पोलिसांचे संयुक्त पथक

या कारवाईत पाचोरा व भडगावचे पोलिस निरीक्षक प्रदीप शेवाळे, निवासी तहसीलदार विनोद कुमावत, कल्याणी वर्मा (पिंपळगाव हरे), मंडळ अधिकारी आर. डी. पाटील, वैशाली पाटील (नांद्रा), भरत नन्नावारे (कुऱ्हाड), प्रकाश डहाके (पिंपळगाव बु.), राहुल पवार (नागरदेवळा बु.) यांच्यासह पाच मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम महसूल अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Girna River Illegal Sand Mining
Jalgaon Fraud | गोशाळेत नोकरीचे आमिष; दामदुप्पट परताव्याच्या आश्वासनाने २३.८३ लाखांची फसवणूक

२९ वाहने एमआयडीसी गोदामात

जप्त करण्यात आलेली सर्व २९ वाहने तातडीने ताब्यात घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आली आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, संबंधित वाहनमालक आणि अवैध वाळू उपशात सहभागी व्यक्तींवर महसूल कायद्यानुसार दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अवैध वाळू उपसा खपवून घेतला जाणार नाही

गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाविरोधात यापुढेही अचानक धाडसत्र सुरूच राहील. अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार विजय बंसोडे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news