

Mud And Garbage On Jalgaon Roads
जळगाव : उशिराने सुरू झालेल्या पावसाने जळगाव महानगरपालिकेच्या स्वच्छता आणि नालेसफाई मोहिमेची पहिल्याच सरीत पोलखोल केली आहे. शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या कालिंका माता मंदिर ते अजिंठा चौफुली या मुख्य मार्गावर नाल्यांमधील चिखल व कचरा रस्त्यावर आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात सुमारे वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर २४ आणि २५ जून रोजी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ आणि कचरा रस्त्यावर वाहून आला. कालिंका माता मंदिर ते अजिंठा चौफुली या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मोठी वाहने गेल्यानंतर चिखलयुक्त पाणी अंगावर उडत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रक उभे राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या बसथांब्यांमध्ये खाजगी वाहने पार्क केली जात असल्याने प्रवाशांना पावसात उघड्यावर उभे राहण्याची वेळ येत आहे. या समस्येकडे महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीबाबत विचारणा केली असता, पोलिसांनी नो-पार्किंग फलक व इतर उपाययोजनांसाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. मात्र, अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रश्नांवर महापौर दीपमाला काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे शहरातील स्वच्छता, वाहतूक आणि अतिक्रमणाच्या प्रश्नांवर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.