

Kharif Sowing Dates
जळगाव : जळगाव जिल्ह्यात २४ आणि २५ जून रोजी चांगल्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी न करता जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच खरिपाच्या पेरणीस प्रारंभ करावा, असे आवाहन ममुराबाद वेधशाळेचे हवामान निरीक्षक सिताराम बेलदार यांनी केले आहे.
ममुराबाद वेधशाळेच्या माहितीनुसार, वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यात दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाची स्थिती अनुकूल झाली आहे. "ड्राय बल्ब" आणि "वेट बल्ब" तापमानातील फरक कमी झाल्यामुळे २४ जूनच्या रात्रीपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात मान्सूनचे आगमन उशिरा झाले. गतवर्षी ६ जून रोजी मान्सून दाखल झाला होता, मात्र यंदा सुमारे २० दिवसांच्या विलंबानंतर २४ जूनला पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. मंगळवारी मुक्ताईनगर येथे संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यादरम्यानही पाऊस झाला. तसेच जिल्ह्यातील विविध भागांत रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचे प्रमाण लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा. शेतात किमान चार इंच ओलावा निर्माण झाल्यानंतर आणि ७० ते १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात करणे योग्य ठरेल.
हवामान तज्ज्ञांच्या मते, २७ ते २८ जूनपासून पेरणीस सुरुवात केल्यास उगवण चांगली होण्यास मदत होईल आणि दुबार पेरणीची वेळ येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या सातत्यपूर्ण स्थितीची खात्री करूनच पेरणीचे नियोजन करावे.