

जळगाव- मागील भांडणाच्या कारणातून एकावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची खळबळजनक घटना चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशनच्या बाहेर गुरूवारी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास घडली. या गोळीबारात 30 वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाच्या मांडीला गोळी चाटून गेली. याप्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती अशी की, रोहिदास राजू कोळी (30) रा.हिरापूर रोड चाळीसगाव याचा दीपक सुभाष मरसाळे रा. सुवर्णाताई नगर, चाळीसगाव याच्याशी गेल्या जून महिन्यात शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्याचा राग येवून दीपक याने रोहीदास याच्या बगलीत चाकू मारून दुखापत केली होती. याप्रकरणी दीपकच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या भांडणातूूनच रोहीदास कोळी हा गुरूवार 18 रोजी रात्री 11.30 वाजेेच्या सुमारास आपल्या मित्रांसमवेत चाळीसगाव रेल्वे स्टेशनलगत भिंतीजवळ सिगारेट पित बसले होते. रात्री 11,45 वाजेच्या सुमारास दीपक सुभाष मरसाळे व त्याच्या सोबत एक इसम असे दोघे आले व त्यांनी गोळीबार केला.
जखमी युवकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी रोहीदास कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास उपनिरीक्षक योगेश माळी हे करीत आहेत.
घटनास्थळी आढल्या गोळ्या
दरम्यान रेल्वे स्टेशन भागात गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमितकुमार मनेल, उपनिरीक्षक योगेश माळी, गणेश सायकर यांनी भेट देवून माहिती घेतली. घटनास्थळावरून बंदूकीच्या दोन गोळ्या व मॅक्झीन आढळून आली ते पोलीसांनी जप्त केले.गोळीबार झाल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.