

ठाणे : मुंब्रा बायपास रोड, गावदेवी मंदिराजवळ दुचाकीवरून जाणार्या तिघा तरुणांना अपघात झाला. खाली पडलेल्या तिन्ही तरुणाचा कंटेनरखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताची नोंद मुंब्रा वाहतूक पोलीस आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. तर कंटेनर चालक हा फरार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मुंब्रा बायपास रोडवर घडलेल्या अपघातात मृतकांमध्ये हसन अक्रम शेख(19), मोहिनउद्दीन मोहम्मद खुशीशेख(19) आणि अफजल साकुर शेख(22) तिघेही गावदेवी मुंब्रा येथे राहणारे आहेत. सोमवारी दुपारी मृतक तिघेही दुचाकी सुझुकी ऍक्सेस क्र. एमएच 04 जेपी 7846 वरून गावदेवी मंदिर येथून मुंब्रा बायपास रोडवरून शिळफाटा रोडकडे वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने निघाले असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून दिलेल्या धडकेत तिघेही दुचाकीवरून खाली पडले आणि कंटेनर क्र एमएच 46 एआर 4447 खाली सापडले आणि जखमी अवस्थेत तिघांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल केले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी करीत त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी अपघाताची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. तर मुंब्रा पोलीस हे अज्ञात कंटेनर चालक याचा शोध घेत आहे.
धुवांधार पावसाने मुंब्रा बायपासची अक्षरश: चाळण केली आहे. बायपासवर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याचे डांबर उखडल्याने आतील सळया बाहेर आल्या आहेत. त्यामुळे या खड्ड्यांमधून वाहनचालक जीव धोक्यात घालून वाहने चालवत आहेत. एखादे अवजड वाहन या खड्ड्यांमुळे उलटल्यास मोठा अपघात होण्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, याच रस्त्यावर तीन जणांना नुकताच अपघात आपला जीव गमवावा लागला आहे. तर यापूर्वी देखील अनेक अपघाताच्या घटना या रस्त्यावर घडल्या.