

NQAS Certification Jalgaon
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता उंचावण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या विविध सुधारात्मक उपक्रमांना राज्यस्तरावर मोठे यश मिळाले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानकांनुसार (NQAS) करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मूल्यांकनात जिल्ह्यातील ८ आरोग्य उपकेंद्रांनी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांना राज्यस्तरीय NQAS प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने प्रभावी पावले उचलण्यात आली. आरोग्य सेवा गुणवत्ता, रुग्ण सुरक्षितता, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, औषध उपलब्धता, रुग्ण समाधान, इमारत सुविधा व कार्यालयीन व्यवस्थापन अशा ८ महत्त्वाच्या निकषांवर ही तपासणी करण्यात आली. या सर्व निकषांची यशस्वी पूर्तता करत जळगाव जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
NQAS नामांकन प्राप्त आरोग्य उपकेंद्रे व गुणांकन :
जळगाव तालुका – नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत तरशोद उपकेंद्र : 90%
अमळनेर – जानवे प्रा.आ.केंद्र अंतर्गत शिरूड उपकेंद्र : 90%
चाळीसगाव – रांजणगाव प्रा.आ.केंद्र अंतर्गत लोनजे उपकेंद्र : 89%
भुसावळ – वडारशिंम प्रा.आ.केंद्र अंतर्गत गोजरे उपकेंद्र : 87%
पारोळा – शिरसोद प्रा.आ.केंद्र अंतर्गत शिवगे उपकेंद्र : 85%
अमळनेर – जानवे प्रा.आ.केंद्र अंतर्गत रानाचे उपकेंद्र : 80%
मुक्ताईनगर – रुईखेडा प्रा.आ.केंद्र अंतर्गत चांगदेव उपकेंद्र : 80%
पाचोरा – नांद्रा प्रा.आ.केंद्र अंतर्गत बमरुड उपकेंद्र : 78%
या राज्यस्तरीय मानांकनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाचे प्रभावी नियोजन, काटेकोर अंमलबजावणी तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे हे फलित आहे.
— मिनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव