Jalgaon DCC Bank Election | महायुतीत जागावाटपाची घोषणा होण्यापूर्वीच तीन जागा बिनविरोध; पारोळा, एरंडोलमध्ये पाटील घराण्यांचे वर्चस्व कायम

शिवसेनेच्या दोन, तर भाजपच्या एका उमेदवाराची निवड निश्चित; महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम
Unopposed Election Jalgaon District Bank Election
अधिकृत जागावाटपाची घोषणा होण्यापूर्वीच तीन जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चितPudhari
Published on: 
Updated on: 

Unopposed Election Jalgaon District Bank

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीच्या अधिकृत जागावाटपाची घोषणा होण्यापूर्वीच तीन जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. पारोळा, एरंडोल आणि भुसावळ या तीन विकास सेवा संस्था मतदारसंघांत अन्य कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने शिवसेनेच्या दोन, तर भाजपच्या एका उमेदवाराचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, पारोळा आणि एरंडोलमध्ये पाटील घराण्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

पारोळा विकास सेवा संस्था मतदारसंघातून शिवसेनेच्या नलिनी चिमणराव पाटील, एरंडोलमधून मृणाल अमोल पाटील, तर भुसावळमधून भाजपच्या रजनी संजय सावकारे यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत या तिन्ही मतदारसंघांत प्रतिस्पर्धी उमेदवार रिंगणात न उतरल्याने बिनविरोध निवडी निश्चित झाल्या आहेत. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत अधिकृत घोषणा करतील.

Unopposed Election Jalgaon District Bank Election
Jalgaon DCC Bank Election | जळगाव जिल्हा बँक निवडणूक : महायुतीतच रस्सीखेच! गिरीश महाजन, मंगेश चव्हाणांसह दिग्गजांचे अर्ज दाखल

पारोळा-एरंडोलमध्ये पाटील घराण्यांचा दबदबा कायम

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पारोळा आणि एरंडोल या दोन मतदारसंघांतील पाटील घराण्यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले आहे. माजी आमदार चिमणराव पाटील हे पारोळा मतदारसंघातून गेल्या २० वर्षांपासून सलग बिनविरोध निवडून येत आहेत. तर आमदार अमोल पाटील हे एरंडोल मतदारसंघातून गेल्या १५ वर्षांपासून बिनविरोध विजयाची परंपरा कायम राखत आहेत.

यंदाच्या निवडणुकीतही त्यांच्या कुटुंबातील नलिनी चिमणराव पाटील आणि मृणाल अमोल पाटील यांचेच अर्ज दाखल झाल्याने या दोन्ही मतदारसंघांतील पाटील घराण्यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. विरोधकांकडून उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने पुन्हा एकदा बिनविरोध निवडीची परंपरा पुढे सुरू राहणार आहे.

Unopposed Election Jalgaon District Bank Election
Jalgaon DCC Bank | जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळी : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड; एकाच दिवशी तब्बल १५६ अर्ज दाखल!

शिवसेनेची दोन जागांवर बाजी; भाजपलाही एक जागा

महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच शिवसेनेने दोन जागांवर बिनविरोध निवडीच्या माध्यमातून आघाडी घेतली आहे. तर भुसावळमधून भाजपच्या रजनी संजय सावकारे यांची निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात या सुरुवातीच्या घडामोडींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

महायुतीत जागावाटपाचा पेच; मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत

तीन जागांवरील बिनविरोध निवडी निश्चित झाल्या असल्या, तरी महायुतीच्या अधिकृत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावर जवळपास सहमती झाल्याचे चित्र असले, तरी शिवसेना आणि भाजपमध्ये काही जागांवरून मतभेद कायम आहेत.

Unopposed Election Jalgaon District Bank Election
Jalgaon DCC Bank Election | जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; २१ जागांसाठी २९ नोव्हेंबरला मतदान

या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी जागावाटपावर अंतिम तोडगा न निघाल्यास काही मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या उर्वरित जागांवर महायुती एकत्रित पॅनेल उभे करणार की मित्रपक्षच एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

तीन जागांवरील बिनविरोध निवडीने निवडणुकीची सुरुवातच राजकीयदृष्ट्या लक्षवेधी झाली असून उर्वरित जागांवरील लढतींकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.