Jalgaon News | जळगावच्या विकासाला ३८० कोटींचा ‘बूस्टर डोस’: अतिरिक्त निधीची सरकारकडे मागणी : पालकमंत्री
Jalgaon Development News
जळगाव : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ९५६ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज (दि.२) मंजुरी देण्यात आली. मात्र, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे आणि नव्या विकासकामांना गती देण्यासाठी हा निधी अपुरा असल्याने राज्य सरकारकडे अतिरिक्त ३८० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
“यंत्रणांकडून एकूण १,७३५ कोटींच्या मागण्या प्राप्त झाल्या असून, जिल्ह्याच्या हितासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल,” असा ठाम विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. जयकुमार रेड्डी यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा या क्षेत्रांतील महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली.
झेडपी शाळांवर सीसीटीव्हीची नजर
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुरक्षितता आणि गुणवत्ता वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व झेडपी शाळांमध्ये डीपीडीसी निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासोबतच १५० शाळांमध्ये सुसज्ज क्रीडांगणे व खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरी भागाप्रमाणे सुविधा मिळाल्याच पाहिजेत,” असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आरोग्यासाठी ‘मेगा प्लॅन’
जिल्ह्यात महिलांमध्ये वाढत असलेल्या कॅन्सरच्या पार्श्वभूमीवर तपासणीसाठी दोन विशेष फिरत्या रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) कार्यान्वित करण्यात येणार आहेत. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्तासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी त्यांना थेट रक्तपेढ्यांशी जोडण्याची व्यवस्था केली आहे. तसेच पारोळा, एरंडोल, अमळगाव, किनगाव आदी पाच ग्रामीण रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहेत.
पोलीस दल होणार अधिक ‘हायटेक’
जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बळकट करण्यासाठी पोलीस दलाला १६ नवीन चारचाकी वाहने देण्यात आली आहेत. ‘आपले पोलीस’ ही संकल्पना अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच शहीद स्मारके उभारणे आणि शासकीय कार्यालयांमध्ये स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ सुरू करण्याचेही नियोजन आहे.
रस्ते, प्रकाशयोजना व वारसा संवर्धन
शहरातील एमआयडीसी रोड ते विमानतळदरम्यान पथदिव्यांची व्यवस्था करण्यात येणार असून, ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. पारोळा येथील ऐतिहासिक किल्ला तसेच फरकांडे येथील स्मारकाच्या दुरुस्ती व जतनासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे
बैठकीला उपस्थित
या बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दृष्टिक्षेपात महत्त्वाचे निर्णय
एकूण मंजूर निधी: ९५६ कोटी रुपये
अतिरिक्त निधीची मागणी: ३८० कोटी रुपये
आदिवासी विकास: रुईखेडे–चारमळीपाडा येथील १८८ कुटुंबांना वीज जोडणी
स्मारके: जिल्ह्यात २९ ठिकाणी शहीद स्मारकांची उभारणी
सुरक्षा: एमआयडीसी रोड ते विमानतळदरम्यान हायटेक पथदिवे

