

जळगाव : जळगावातील मच्छीबाजार, तांबापुरा परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 93 हजार रुपये किमतीचा 15 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका 59 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या माहितीनुसार, मच्छीबाजार तांबापुरा येथील एका घरात एका व्यक्तीने मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवला असून त्याची चोरटी विक्री केली जात आहे.
या माहितीच्या आधारे, सपोनि. अनिल वाघ यांनी तात्काळ एक पथक तयार केले. घटनास्थळी धाड टाकली. या पथकात पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके, पोहेकॉ किरण चौधरी, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी, पोकॉ गणेश ठाकरे, पोकॉ किरण पाटील, पोकॉ नितीन ठाकूर, पोकॉ राहुल घेटे आणि पोकॉ योगेश घुगे यांचा समावेश होता.
पथकाने यावेळी संशयित आरोपी मेहमुद शेख मेहबुब (वय 59) याच्या घराची झडती घेतली. यावेळी घरामध्ये दोन गोण्यांमध्ये 15 किलो 525 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्याची बाजारपेठेतील किंमत 93 हजार 150 रुपये आहे. पोलिसांनी तातडीने पंचांना बोलावून, वजनकाटा आणि फॉरेन्सिक व्हॅनच्या मदतीने सर्व गांजा जप्त केला.
पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून मेहमुद शेख मेहबुब यांच्या विरोधात एनडीपीएस ॲक्ट कलम 8(क), 20(ब) (II) (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयीत आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि राहुल तायडे आणि पोकॉ चेतन पाटील करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.