

पाचोरा (जळगाव) : पाचोरा तहसील कार्यालयातील तत्कालीन महसूल सहाय्यक अमोल सुरेश भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण या दोघांनी नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर बनावट यादी तयार करून तब्बल एक कोटी वीस लाख 13 हजार 517 रुपयांचा शासकीय निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सन 2022 ते 2025 या कालावधीत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आपत्ती अनुदानामध्ये फेरफार करत आरोपींनी 347 शेतकऱ्यांची बनावट नोंदणी केली आहे. लाभार्थींच्या खात्यात शासनाचे पैसे वर्ग करून ती रक्कम परस्पर काढून घेण्यात आली आहे.
चौकशी समितीच्या तपासात आरोपींनी पंचनामे व शासकीय दस्तऐवज बनावट तयार केले असल्याचे निष्पन्न झाले. या कामासाठी त्यांनी शासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधींचा वापर करून तहसीलदारांच्या लॉगिन आयडी व पासवर्डचा गैरवापर केल्याचे समोर आले.
या प्रकरणी तहसीलदार विजय बनसोडे यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पाचोरा पोलिसांनी गु. रजि. क्र. 428/2025 अंतर्गत भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 316(4), 316(5), 318(4), 335, 336(2)(3), 340(2), 3(5) अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार हे पुढील तपास करीत आहेत. अमोल सुरेश भोई यांच्याविरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, सध्या ते चाळीसगाव तहसील कार्यालयात कार्यरत आहेत.
अमोल भोई व युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये पंचनामेच्या नोंदणींमध्ये खोटे व बनावट शासकीय दस्तावेत तयार केले त्यासाठी शासकीय कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी कुठे यांच्या वापर केला व यांनी शासनाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तहसीलदारांच्या लॉगिन आयडी व पासवर्डचा गैरवापर केला.