

जळगाव : पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक नसल्याचे सांगत इंधन देण्यास नकार दिल्यामुळे दोन तरुणांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या हल्ल्यात २१ वर्षीय कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील म्हसावद गावातील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली. तुषार गुरव (वय २१) असे जखमी झालेल्या पेट्रोल पंप कर्मचारी तरुणाचे नाव आहे. पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा साठा शिल्लक नव्हता. त्यामुळे तुषारने तेथे आलेल्या दोन तरुणांना पेट्रोल देण्यास नकार दिला. याच गोष्टीचा प्रचंड राग आल्याने संतापलेल्या तरुणांनी तुषारशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही संशयित तरुणांनी थेट चाकू काढून कर्मचारी तुषारच्या पोटात खुपसला. हा हल्ला अत्यंत भीषण होता, ज्यामध्ये तुषारच्या पोटात ३ ते ४ इंचापर्यंत खोल जखम झाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तुषारला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पावले उचलली आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या दोन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून, पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार झालेल्या दोन्ही अनोळखी हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात मात्र काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.