शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे महिलेच्या पोटात राहिले कापड

Dhule crime news | २ डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे महिलेच्या पोटात राहिले कापड
Published on
Updated on

सोनगीर : शिरपूर तालुक्यातील वाकपाडा येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय महिलेला पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला होता. या उपचारासाठी त्या आपल्या पतीसह शहरातील एका खाजगी रुग्णालयात गेल्या होत्या. डॉक्टरांनी तपासणी अंती गर्भपिशवीचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महिलेवर पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली.

परंतु, काही काळानंतर महिलेला पुन्हा असह्य त्रास जाणवू लागला. संबंधित डॉक्टरांकडे महिला पुन्हा गेल्या असता डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगत २ लाख रुपये खर्च लागणार असे सांगितले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व खर्च जास्त सांगत असल्याने महिलेने व त्यांच्या पतीने इतर रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. तिथे करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या पोटात कापडासारखी कोणतीतरी परकी वस्तू असल्याचे निदर्शनास आले.

अखेर धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांचा हा निष्काळजीपणा अधिकृतपणे समोर आला. दोषी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी स्वतःच्या जीवावर बेतलेल्या या प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली. या निष्काळजीपणासाठी कारणीभूत ठरल्याबद्दल पोलिसांनी या डॉक्टरांविरुद्ध शिरपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. डॉक्टर वैशाली तमखाणे (कृष्णा हॉस्पिटल), डॉक्टर दर्शन शशांक कुलकर्णी (कुलकर्णी हॉस्पिटल) शहादा या दोन्ही डॉक्टरांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 च्या कलम 125 (ब) जीवितात धोका निर्माण होईल असे कृत्य करणे अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे शिरपूर परिसरात खाजगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news