Car silencer theft gang: गाड्यांचे सायलेंसर फोडून मौल्यवान धातू चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; पारोळा पोलिसांची कारवाई

Jalgaon crime: कारमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टरची पावडर लंपास करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या दोघांना बेड्या; म्हसवे शिवारात नाकाबंदीत पर्दाफाश
Jalgaon crime
Jalgaon crime
Published on
Updated on

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरून सुसाट धावणाऱ्या गाड्यांच्या सायलेंसरमधून चक्क सोन्या-चांदीहून महागड्या धातूंची पावडर चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या पारोळा पोलीस आणि पाळधी महामार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील म्हसवे गावाजवळ शनिवारी ५ च्या रात्री संशयित वॅगनार कार अडवून पोलिसांनी केलेल्या झडतीत ईको वाहनांचे ३ सायलेंसर आणि तब्बल ५ ते ६ किलो मौल्यवान धातूंची भुकटी (कन्व्हर्टर पावडर) जप्त केली.

या कारवाईत उत्तर प्रदेशातील दोघा अट्टल भामट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, मुंबई-ठाण्यासह राज्याच्या विविध भागांत पसरलेले मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jalgaon crime
Jalgaon Crime | दीपनगर औष्णिक केंद्रात डल्ला मारणाऱ्या कोळसा चोरांना खाकीचा दणका!

महामार्गावर सापळा अन् ‘दिल्ली पासिंग’ कार अडवली

पारोळा पोलीस ठाणे व पाळधी महामार्ग पोलीस केंद्राच्या पथकाने म्हसवे शिवारात संयुक्त नाकाबंदी लावली होती. संशयास्पदरीत्या येणाऱ्या निळ्या रंगाच्या मारुती सुझुकी वॅगनार कार क्रमांक डी एल -3-सी बी यू -3358 हिला पोलिसांनी हात दाखवून थांबवले. गाडीची बारकाईने तपासणी केली असता आत बसलेल्या दोघांची भंबेरी उडाली. वाहनाची तपासणी करताच पोलिसांना ईको वाहनांचे कापलेले ३ जुने सायलेंसर/कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि तब्बल ५ ते ६ किलो वजनाची रासायनिक पावडर आढळून आली. सुमारे ५० हजार रुपयांच्या या मुद्देमालासह पोलिसांनी कार जप्त केली.

उत्तर प्रदेशचे दोघे गजाआड

या प्रकरणी पोलिसांनी आसीफ यामीन (वय २२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि आरीफ सलीम (वय २३, रा. अलीगड, उत्तर प्रदेश) या दोघांना जागीच ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत या दोघांनी मुंबई, ठाणे आणि महामार्गालगतच्या शहरांमधून ईको गाड्यांचे सायलेंसर कापून त्यातील मौल्यवान पावडरची अवैध विक्री केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

Jalgaon crime
Jalgaon crime news: एरंडोलमध्ये बंद घराचे कुलूप तोडून ७ लाखांचा ऐवज लंपास

प्लॅटिनम, रोडिअमची धूळ चोरण्याचा 'उद्योग'

वाहनांमधून निघणारा विषारी धूर नियंत्रित करण्यासाठी कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये मधमाशांच्या पोळ्यासारखी रचना असते. त्यावर प्लॅटिनम , पॅलेडियम आणि रोडिअम या अत्यंत महागड्या धातूंचा लेप असतो. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात या धातूंना प्रचंड भाव असल्याने ही टोळी सायलेंसर फोडून त्यातील पावडर गोळा करत होती.

चोरांच्या रडारवर ‘ईको’च का?

  • जास्त ग्राउंड क्लिअरन्स: ईको कार रस्त्यापासून बऱ्यापैकी उंच असल्याने चोरांना गाडीखाली घुसणे सहज शक्य होते.

  • कमी वेळात कटिंग: आधुनिक कटरच्या साहाय्याने अवघ्या काही मिनिटांत कन्व्हर्टर कापून वेगळा करता येतो.

  • भरपूर धातूचे प्रमाण: इतर वाहनांच्या तुलनेत या गाडीच्या कन्व्हर्टरमध्ये धातूंचा लेप चांगल्या प्रमाणात मिळतो.

Jalgaon crime
Jalgaon crime: नशिराबादमध्ये ३.५ किलो गांजासह दोघांना अटक; २ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

आंतरराज्य रॅकेटचा माग सुरू

धूर गाळणाऱ्या यंत्राची चोरी करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या आणि वाहनधारकांना चुना लावणाऱ्या या भामट्यांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३, ३१७(२), ३१७(४), ३१७(५), ३२४(४), ३२४(५) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १९९A अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही पावडर ते कोणाला विकत होते आणि या टोळीचे सूत्रधार कोण आहेत, याचा कसून तपास पारोळा पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news