

जळगाव : भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून थेट रेल्वे ट्रॅकवरून कोळसा लंपास करणाऱ्या टोळीचा भुसावळ तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सुरक्षा अधिकाऱ्याशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणत पसार झालेल्या भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील तब्बल ८ चोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपींकडून चोरीचा ५ टन कोळसा आणि गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ १ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ७ ते ८ जण रेल्वे ट्रॅकवरील कोळसा चोरून ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याची माहिती सुरक्षा अधिकारी सोमेश्वर मधुकर जाधव यांना मिळाली. जाधव पथकासह घटनास्थळी पोहोचले असता चोरटे ट्रॅक्टरमध्ये कोळसा भरताना रंगेहात सापडले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता, शेखर बावस्कर, धीरज सोनवणे, मुकेश सोनवणे, जितेंद्र शिंदे, मोहित पाटील, विजय पावरी (सर्व रा. फुलगाव) अशी नावे निष्पन्न झाली. मात्र, सोबत असलेल्या दोन अज्ञात साथीदारांनी सुरक्षा अधिकाऱ्याशी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि कोळशाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन तिथून पळ काढला.
या प्रकरणी सोमेश्वर जाधव यांच्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ (ई), १३२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा (गु.र.नं. १६८/२०२६) दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरांचा माग काढून ८ जणांना ठोकल्या बेड्या
गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक हेमंत मिटकरी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांनी कसून तपास करत पसार झालेल्या दोन अज्ञात आरोपींची ओळख पटवली. यात रोहित किरण सोनवणे आणि सागर रवींद्र कोळी (दोन्ही रा. फुलगाव) यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने सापळा रचून आठही आरोपींना जेरबंद केले.
न्यायालयात हजर केले असता आरोपींना ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीदरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच -19 सी झेड-3873 व ट्रॉली क्रमांक -19 ए एन-6584 असा २ लाखांचा वाहन साठा आणि २० हजार रुपये किमतीचा ५ टन चोरीचा कोळसा, असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, स.फौ. संजय तायडे, पोहेकॉ योगेश पालवे, पोना हेमंत मिटकरी, पोकॉ जितेंद्र ठाकरे, पोकॉ किरण तायडे, पोकॉ मुकेश मेढे, पोकॉ सुभाष सोनवणे व पोहेकॉ कैलास बाविस्कर यांच्या पथकाने केली.