Jalgaon Crime : दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने केली पत्नीची चाकूने भोसकून हत्या

भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील घटना
Jalgaon Crime News
दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने केली पत्नीची चाकूने भोसकून हत्या
Published on
Updated on

जळगांव : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली. ही घटना रविवारी (दि.२६) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ललिता आत्माराम राठोड (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतवाडी तांडा येथे आत्माराम पतीलाल राठोड (वय ४०) याने पत्नी ललिता यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, पत्नीने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले.यादरम्यान संतापाच्या भरात आत्माराम याने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ललिता यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे.

किरकोळ कारणावरून होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांमुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती, व्यसनमुक्ती आणि कौटुंबिक समुपदेशनाची गरज अधिक अधोरेखित होत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. या दुर्दैवी घटनेने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला असून कौटुंबिक वाद आणि व्यसनाधीनतेचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news