

Jilha Peth Police Action
जळगाव : एसटी बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत महिला चोरट्यांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. नात्याने देराणी-जेठाणी असलेल्या या दोन्ही महिलांकडून तब्बल १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
जळगावच्या नवीन बसस्थानकावर जळगाव-चाळीसगाव बसमध्ये चढत असताना एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि कानातील टॉगल असा एकूण ४५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबवला होता. याप्रकरणी २० जुलै रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२६/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांनी विशेष शोध पथकाची नियुक्ती केली. पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला.
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून उषा चंदन ससाणे (वय ४८, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव, मूळ रा. चाळीसगाव) आणि अनिता विजय ससाणे (वय ३५, रा. वाघ नगर, जळगाव) यांना ताब्यात घेतले.
दोन्ही संशयित महिलांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा क्रमांक २२६/२०२६सह जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी दोन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये गुन्हा क्रमांक १७३/२०२६ आणि २१२/२०२६ यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपी महिलांच्या पूर्वइतिहासाची पडताळणी केली असता, अमळनेर आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यांतही त्यांच्याविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून पुढील सोन्याचे दागिने जप्त केले :
४५ हजार ५० रुपयांची ८ ते ९ ग्रॅम सोन्याची पोत आणि ४ ग्रॅमचा टॉगल.
१५ हजार रुपयांची ४ ते ५ ग्रॅम सोन्याची पोत.
४५ हजार रुपयांची ७ ते ८ ग्रॅम सोन्याची पोत.
अशा प्रकारे एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोहवा गणेश शिरसाळे, नरेश सोनवणे, महेंद्र पाटील, किरण वानखेडे, तेजस मराठे, कमलाकर बडगुजर, प्रशांत सैंदाणे, अजय अहिरे, अजय सपकाळे, नरेंद्र दिवेकर, महिला पोलीस वैशाली सोनवणे, सुषमा ढमढेरे तसेच नेत्रम शाखेचे मुबारक देशमुख आणि रुस्तम तडवी यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत.