

Bhusawal MIDC NRJ Pharmachem Fire
जळगाव : भुसावळ एमआयडीसी परिसरातील ‘एनआरजे फार्माकेम प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीत कंपनीतील सुमारे २० ते २५ टन रासायनिक कच्चा माल जळून खाक झाला असून, प्राथमिक अंदाजानुसार अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झाली नसली, तरी कंपनी परिसरातील दोन गायींचा होरपळून मृत्यू झाला.
कंपनीत आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यानंतर कंपनीतून एकापाठोपाठ एक स्फोटांचे आवाज येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला.
जितेंद्र वानखेडे यांच्या मालकीची ही कंपनी असून, येथे इनऑरगॅनिक व ऑरगॅनिक ॲग्रो केमिकल्स तसेच खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती केली जाते. कंपनीत अचानक आग भडकताच घटनेची माहिती पोलिस कंट्रोल रूममार्फत अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर भुसावळ नगरपालिका, जळगाव, वरणगाव नगरपरिषद, दीपनगर औष्णिक वीज केंद्र आणि वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले.
आगीची तीव्रता लक्षात घेता विविध ठिकाणांहून २० ते २५ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्न करत पाण्याचा मारा सुरू ठेवला. संयुक्त प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त होत असताना महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल पाटील यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कंपनीच्या गेटजवळील वीज वितरण कंपनीचे मीटर आगीमुळे पूर्णपणे वितळल्याचे आढळून आले. तसेच परिसरातील झाडालाही आगीची झळ पोहोचली आहे.
मात्र, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रासायनिक अभिक्रियेमुळे आग लागली की अन्य कोणते कारण आहे, याबाबत विविध शक्यता तपासल्या जात आहेत. या प्रकरणी भुसावळ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.