Jalgaon Bribe News : जामनेर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला २५ हजारांची लाच घेताना पकडले!

नवीन रस्ता करुन देण्यासाठी मागितली होती 30 हजाराची लाच
Bribe
Bribe
Published on
Updated on

जळगांव : शेतात जाण्या-येण्यासाठी नवीन रस्ता मंजूर करून देण्याच्या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागीतली. ती स्वीकारल्याप्रकरणी जामनेर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकासह एका खासगी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (२१ सप्टेंबर) ताब्यात घेतले. महसूल सहाय्यक प्रवीण सुपाडू गांगुर्डे (वय ४१) आणि खासगी इसम योगेश रामलाल वखरे (वय ४२, रा. जामनेर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

तक्रारदाराचे जामनेर शिवारात गट क्रमांक ४०७ मध्ये शेत असून, शेतात जाण्या-येण्यासाठी नवीन रस्ता मिळावा यासाठी त्यांनी २०२२ मध्ये तहसील कार्यालयात वहिवाटीचा दावा दाखल केला होता. या दाव्याची तहसीलदारांसमोर वेळोवेळी सुनावणी झाली असून, तो अंतिम निकालासाठी प्रलंबित आहे.

या प्रकरणात तक्रारदाराने तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण गांगुर्डे यांची भेट घेतली असता, तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. तडजोडीनंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने २१ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली.

तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी खासगी इसम योगेश वखरे याने गांगुर्डे यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.

त्यानंतर सोमवारी जामनेर तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी योगेश वखरे याने पंचांसमक्ष २५ हजार रुपयांची लाच स्वीकारून ती प्रवीण गांगुर्डे यांच्याकडे दिली. गांगुर्डे यांनी ही रक्कम स्वतः स्वीकारून पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवताच एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने व प्रदीप पोळ यांचा समावेश होता. कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी भारत तांगडे, प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news