

Amalner son kills father
जळगाव : अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरातील ३६ खोली भागात पिता पुत्रामध्ये झालेल्या किरकोळ वादातून संतप्त झालेल्या मुलाने लोखंडी हातोडीने वडिलांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना ठार केले. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अमळनेर शहरातील 36 खोली भागात राजेंद्र दत्तात्रय रासने (वय ६४) हे त्यांच्या राहत्या घरी रविवारी ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सुनील लोखंडे आणि इतर पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र रासने यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. राजेंद्र यांचा मुलगा भूषण राजेंद्र रासने (वय ३६) यानेच त्यांच्या डोक्यात लोखंडी हातोडीने वार करून त्यांचा खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन त्वरित आरोपी भूषण रासने याला ताब्यात घेतले.
पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी खुनासाठी वापरलेली लोखंडी हातोडी जप्त केली आहे, तर फॉरेन्सिक तज्ज्ञांनी पुरावे म्हणून घटनास्थळावरून नमुने गोळा केले आहेत. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी भूषण रासनेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करत आहेत.