

Amalner taluka Lon Khurd farmer Death
जळगाव : अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द गावातील ३६ वर्षीय तरूणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारी उघडकीस आली. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान विजय पाटील (वय ३६, रा. लोणखुर्द ता. अमळनेर) असे मृत तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.
अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द गावात समाधान पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी सकाळी ते घरातून निघून गेले. समाधान पाटील हे घरी दिसत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी गावामध्ये त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळले नाहीत. त्यानंतर, त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दुपारी ३ वाजता समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान पाटील यांच्यावर मोठे कर्ज होते आणि याच कारणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
काही ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना विहिरीतून बाहेर काढून तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासणी केल्यानंतर मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील हे करीत आहे.