

जळगाव : जळगाव विमानतळाचा विस्तार लवकरच होणार असून, दोन मोठ्या आणि एका छोट्या विमानाच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. सुमारे 30 कोटी रुपयांच्या खर्चातून विमानतळावर नवीन इमारत उभारली जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन पुढील पंधरा दिवसांत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेला विमानतळ प्राधिकरणाचे संचालक हर्षकुमार त्रिपाठी, हवाई वाहतूक नियंत्रण प्रमुख नवीन आर्या आणि तांत्रिक विभागाचे निर्मल तिवारी उपस्थित होते. खासदार वाघ यांनी सांगितले की, सध्या विमानतळावर अनेक मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. प्रवाशांना भेडसावणाऱ्या या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यातूनच 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यातून वर्षभरात नवीन इमारत उभारली जाणार आहे.
या इमारतीत प्रवाशांसाठी प्रशस्त बसण्याची व्यवस्था, सामानासाठी कन्व्हेयर बेल्ट, चार तिकीट खिडक्या, बालक कक्ष, वैद्यकीय कक्ष, दुकाने आणि स्वच्छतागृहे अशा सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. विमानतळावर दोन मोठ्या प्रवासी विमानांसह एका लहान विमानाची पार्किंग व्यवस्था होणार आहे. भविष्यात येथे कार्गो सेवा सुरू करण्याचाही मानस असल्याचे खासदार वाघ यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, या सेवेमुळे शेतकऱ्यांच्या केळी व इतर कृषी उत्पादनांची भारतातील विविध बाजारपेठांत जलद वाहतूक सुलभ होईल. तसेच इंडिगो, स्टार अशा विमान कंपन्यांच्या सेवा जळगावमधून सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच दिल्ली, इंदौर आणि इतर ठिकाणांसाठी थेट उड्डाणे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.