Jalgaon Accident | जामनेर-पहूर मार्गावर भीषण अपघात; पोषण आहाराच्या टेम्पोखाली दोन हमालांचा दुर्दैवी अंत!

शेंदुर्णीजवळ टायर फुटल्याने ४०७ टेम्पो पलटी; गोण्यांवर बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू
Jalgaon Accident
Jalgaon Accident
Published on
Updated on

जळगाव : जामनेर-पहूर मार्गावरील शेंदुर्णीजवळ शालेय पोषण आहाराची वाहतूक करणारा ४०७ टेम्पो टायर फुटल्याने पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन हमालांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १५ सप्टेंबर रोजी घडली. मृतांमध्ये जगदीश लालचंद पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) आणि अर्जुन तुकाराम पाटील (रा. बहिरम नगर, पाचोरा) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथून शालेय पोषण आहाराच्या गोण्या टेम्पोत भरून वाहतूक केली जात होती. दोन्ही हमाल मालाच्या गोण्यांवर बसून प्रवास करीत होते. शेंदुर्णीजवळ टेम्पोचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या वेळी गोण्यांवर बसलेले दोन्ही हमाल वाहनाबाहेर फेकले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

टायर फुटला, पण जबाबदारी कोणाची?

अपघाताचे प्राथमिक कारण टायर फुटणे सांगितले जात असले तरी, या घटनेने शालेय पोषण आहाराच्या वाहतुकीतील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मालवाहू वाहनातून कामगारांना मालाच्या गोण्यांवर बसवून नेण्यास परवानगी होती का? वाहनाची स्थिती आणि फिटनेस तपासण्यात आला होता का? वाहनाचे परमिट, विमा व अन्य कागदपत्रे वैध होती का? तसेच संबंधित वाहतूक कंत्राटदाराने कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या होत्या, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

शासकीय योजनेशी संबंधित मालाची वाहतूक करताना नियमांचे पालन झाले होते की नाही, याची चौकशी होणे आवश्यक आहे. पोषण आहार नेमका कोणत्या केंद्रासाठी नेण्यात येत होता, वाहतुकीचे कंत्राट कोणाकडे होते आणि संबंधित वाहनाची नियमित तपासणी करण्यात आली होती का, याचाही तपास होणे गरजेचे आहे.

पहूर पोलिसांकडून तपास सुरू

अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताच्या कारणांचा तसेच वाहनाच्या कागदपत्रांचा आणि वाहतुकीतील नियमपालनाचा तपास सुरू आहे.दरम्यान, दोन कष्टकरी हमालांचा जीव गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाची केवळ अपघात म्हणून नोंद न करता, वाहतूक प्रक्रियेत काही नियमभंग किंवा निष्काळजीपणा झाला होता का, याची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी आणि मृतांच्या वारसांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news