जळगाव : पारोळा पंचायत समितीच्या अंतर्गत कामांशी वर्क ऑर्डर तसेच बिल काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाखांची लाच मागणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध जळगाव एसीबी पोलीसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई बुधवारी (दि.२३) करण्यात आली.
पारोळा तालुक्यातील सावखेडा तुर्क येथील ३३ वर्षीय तक्रारदाराने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ या गावी पेव्हर ब्लॉक बसविणे आणि काँक्रिट रस्ता बनवण्याचे सात लाखांचे काम तसेच सावखेडा तुर्क गावातील रस्त्यांचे खडीकरण करण्याचे ६० लाखांचे काम व शासनाच्या ९०-१० हेडखाली ३० लाखांचे काम अशी एकूण ९० लाखांची कामे घेण्यात आली होती. त्यापैकी सावखेडा होळ गावात केलेल्या कामांचे उर्वरित पैशाचे बिल आणि सावखेडा तुर्क गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात गटविकास अधिकार्यांनी दोन लाख रूपयांची लाच मागितली.
तसेच विस्तार अधिकारी सुनील पाटील यांनी फिर्यादीस दोन लाख रुपये लाच रकमेपैकी एक लाख रुपये लाच रक्कम अॅडजस्ट करून लाच रक्कम आरोपी गटविकास अधिकार्यांना देण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच अन्य तिघांनी स्वतः साठी व आरोपी गटविकास अधिकार्यांसाठी दोन टक्के प्रमाणे लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांच्याविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांमध्ये पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (५६, मानराज पार्क, जळगाव), विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (वय ५८, रा.मुक्ताई नगर), गणेश प्रभाकर पाटील (वय ५०, रा.मानसिंगका नगर, पाचोरा), अतुल पंढरीनाथ पाटील (वय ३७ रा.मोंढाळे प्र.अ., ता.पारोळा), सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी) योगेश साहेबराव पाटील (वय ३७, गुलमोहर बाग, पारोळा) यांचा समावेश असून योगेश पाटील व्यतिरीक्त वरील चारही संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींच्या अटकेची कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी आदींनी केली आहे.