जळगाव : जिल्ह्यामधील अकरा विधानसभा क्षेत्रातील १७६ उमेदवारांनी आज ३६४ नामनिर्देशन पत्राची खरेदी केली. एरंडोल विधानसभा क्षेत्र सोडल्यास जिल्ह्यातील १० विधानसभा क्षेत्रांमध्ये कोणत्याच उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. अकरा विधानसभा क्षेत्रातील युती व आघाडी मधील उमेदवारांनी मुहूर्त काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत दिलेले आहेत.
जळगाव जिल्ह्याच्या पहिल्या नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिवशी एरंडोल विधानसभा क्षेत्र येथे शिवसेना शिंदे गट कडून अमोल चिमणराव पाटील यांनी तर अपक्ष म्हणून दत्तू रंगराव पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर उर्वरित जिल्ह्यातील १० विधानसभा क्षेत्रांमध्ये कोणत्याही उमेदवाराने पहिल्या दिवशी नामनिर्देशन पत्र भरले नाही. अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये ३६४ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असून १७६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र खरेदी केले आहे. दुसरीकडे बहुतांशी उमेदवार हे २४ तारखेला गुरुपुष्पामृत या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील युतीचे उमेदवार पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे सुरेश भोळे, गिरीश महाजन, शिंदे गटाचे किशोर आप्पा पाटील हे २४ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.