Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांची 'राजकीय शाळा'; 'दादांना' संयमाचा सल्ला देत महायुतीच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक :
Gulabrao Patil
Gulabrao Patil
Published on: 
Updated on: 

​जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित 'महायुती पदाधिकारी बैठकीत' राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. एकीकडे त्यांनी महायुतीच्या समन्वयाचे आणि बिनविरोध निघालेल्या १२ जागांचे कौतुक केले, तर दुसरीकडे एका नवनिर्वाचित आमदाराच्या नाराजीवर आपल्या ४० वर्षांच्या राजकीय अनुभवाचे डोस देत त्यांना संयम राखण्याचा कानमंत्र दिला.

​'तुमच्या वयात आम्ही जास्त गरम होतो'

बैठकीत एका नवीन आमदाराने ("दादा") भाषणात संघर्षाबाबत काही खंत व्यक्त केली होती. त्याचा धागा पकडत गुलाबराव पाटील यांनी स्वतःच्या जुन्या आक्रमक काळाची आठवण करून दिली. ते म्हणाले, "तुमच्या वयात असताना आम्ही तुमच्यापेक्षा जास्त गरम होतो. ३०२, ३०७, चॅप्टर केस, १५१, ५६ ब हे सगळे गुन्हे मी अंगावर घेऊन आलो आहे. १९८४-८५ च्या काळात पक्षाचा भगवा झेंडा लावणेही कठीण होते, तेव्हा काँग्रेसचे वर्चस्व होते. पण माणसाचे वय जसे वाढते, तसा तो दुश्मनी कमी करण्याचा प्रयत्न करतो." वयाच्या साठीनंतर आता रोज कोणाशी संघर्ष करायचा नाही, तर अनुभवातून आलेल्या परिपक्वतेने पुढे जायचे आहे, असे सांगत त्यांनी याच संयमामुळे बँकेच्या निवडणुकीत सुमारे १२ जागा बिनविरोध मिळाल्याचे स्पष्ट केले. या यशाचे श्रेय त्यांनी मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे आणि महायुतीच्या सर्व आमदारांच्या एकत्रित भूमिकेला दिले.

​काव्यमय शैलीत टोला आणि जामनेर पॅटर्नवर मिश्किल टिप्पणी

सध्याच्या राजकारणाची बदललेली शैली सांगताना पाटील यांनी काव्यमय टोला लगावला. कार्यकर्त्यांना वाटते की भाऊ पहिल्यासारखे आक्रमक राहिले नाहीत, पण "हल्लीच्या जगामध्ये तोंड जरा बंद पाहिजे, पटकन बोलायची वेळ जरा मंद पाहिजे, एखाद्या गुलाबाचा सुगंध पाहिजे," असे म्हणत त्यांनी चिडचिड न करता काम करण्याचा सल्ला दिला.

तसेच, मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरच्या कार्यपद्धतीचा मिश्किल उल्लेख करत, सकाळी १० वाजताची वेळ देऊन कार्यक्रम प्रत्यक्षात साडेबारा वाजता सुरू झाल्याचे सांगत त्यांनी हलक्याफुलक्या शैलीत टोला लगावला आणि "जिस बात के तू वकील हो, उस बात का मैं गवाह हूँ" असा शेरही ऐकवला.

​स्वतःच्या मुलाच्या माघारीचे दिले उदाहरण; जुने मतभेद विसरण्याचे आवाहन

तिकीट वाटपावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असणे स्वाभाविक असले, तरी पक्षाचा आदेश अंतिम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "ज्यांच्या घरी पंगत राहते, तो उपाशी राहतो," अशी म्हण वापरून त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. स्वतःचा मुलगा प्रताप हा देखील इच्छुक असताना पक्षाच्या आदेशानुसार त्याने माघार घेतल्याचे उदाहरण त्यांनी दिले, तसेच ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांचे "क्षमा वीरस्य भूषणम्" असे म्हणत कौतुक केले. "माझे आणि गुलाबराव देवकर आप्पांचे विचार पूर्वी वेगळे असतील, पण आज महायुतीत एकत्र बसल्यावर आपण एकाच विचाराने काम करत आहोत," असे सांगत त्यांनी सर्व मतभेद विसरून कामाला लागण्याचे आवाहन केले. संजय सावकारे यांच्या बाबतीतही काही त्रास झाला असला, तरी आता महायुतीमध्ये सर्व काही 'अलबेल' असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

​२१ पैकी २१ जागा जिंकण्याचा निर्धार

जळगाव जिल्ह्यात महायुतीकडे ३ खासदार आणि १२ आमदारांची मोठी ताकद आहे. तसेच सोसायटी, मजूर संस्था आणि फेडरेशनमधील कार्यकर्त्यांच्या याद्या व संपर्क क्रमांक तयार असून, कार्यकर्त्यांनी मतदारांशी थेट संपर्क साधावा, असे निर्देश त्यांनी दिले. दूध संघाप्रमाणेच जिल्हा बँकेचा कारभारही कोणत्याही पक्षीय भेदाशिवाय उत्तम चालवून पश्चिम महाराष्ट्रातील बँकांच्या तुलनेत आपल्या बँकेची प्रगती साधायची आहे, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.