

जळगाव : महसूल दिनाच्या सत्कार कार्यक्रमांमध्ये गुलाबराव पाटील यांनी महसुलाच्या कारभारावर बोलताना केलेल्या टीकेला उत्तर देताना आपण शासनकर्ते आहोत, टीका करू नये असा टोला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटलांना दिला
महसूल दिनाच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी महसूल विभागाच्या केलेल्या कामकाजावर टीकेवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, आपण शासनकर्ते आहोत आपण टीका करू नये हा विधान सभेत किंवा कॅबिनेटमध्ये मांडण्याचा आहे कोण काम करतं, कोण करत नाही आणि तो विषय काढायचा दिवसही आज नाही, असा टोला गिरीश महाजन यांनी पालकमंत्र्यांना लगावला.
चांगले काम करणारे लोक आठवणीत राहतात आणि शेवटपर्यंत त्यांचे नाव घेण्यात येते. त्यामध्ये जिल्हाधिकारी आहेत. ते सर्वांना बरोबर सांभाळून घेतात. सर्वांना सांभाळण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा हातखंडा आहे. आमदार सुरेश भोळे तुम्ही मामा आहात पण ते सर्वांना मामा बनवतात. पुढे मागे नोकरीत राहणार नाही, मला राजकारणात यायचं आहे असं ते एकदा म्हणाले आहेत. अशा माणसांची आम्हाला गरज आहेच, केंद्रात देखील किती अधिकाऱ्यांना आम्ही मंत्री केले आहे ते तुम्ही बघितले आहे. मागेपुढे निश्चित त्यांचाही विचार होईल, असे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भारतीय जनता पक्षात येण्याची ऑफरच देऊन टाकली. महसूल खात्यात प्रत्येकाला नोकरी पाहिजे आहे, बाकी इतर खात्यांकडे कोणी लक्ष देत नाही एवढी ताकद या खात्यात आहे, असे देखील गिरीश महाजन म्हणाले