

Jalgaon Gold Price Today
जळगाव : 'सोनं गेलं आकाशाला आणि चांदी गेली ढगाला' अशी ओरड करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला आहे. सुवर्णनगरीच्या सराफा बाजारात गुरूवारी (दि. २२) सोन्या-चांदीच्या दरांनी मान टाकली. एकाच दिवसात २४ कॅरेट सोन्याचे दर ३,५०० रुपयांनी खाली आले आहेत, तर चांदीच्या भावात तब्बल १५,००० रुपयांची विक्रमी घसरण झाली आहे. लग्नसराईच्या तोंडावर भाव गडगडल्याने ग्राहकांच्या आधार मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सोन्याला आज जबर 'ब्रेक' लागला. काल दि. २१सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर होते, मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि स्थानिक मागणीतील तफावतीमुळे आज बाजार उघडताच दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.
सोन्याच्या २४ कॅरेट मध्ये ४ हजार ५००
चांदीचे दर तर ३ लाखांच्या घरातून थेट खाली आपटले आहेत.
अशी झाली दरांची 'उलटफेर' (तुलनात्मक दर):
२४ कॅरेट सोने (प्रतितोळा/१० ग्रॅम):
काल (२१ जानेवारी): १,५५,००० रुपये
आज (२२ जानेवारी): १,५१,५०० रुपये
घसरण: ३,५०० रुपये
२२ कॅरेट सोने (दागिन्यांचे दर):
काल (२१ जानेवारी): १,४१,९८० रुपये
आज (२२ जानेवारी): १,३८,७७४ रुपये
घसरण: ३,२०६ रुपये
चांदी (प्रतिकिलो):
काल (२१ जानेवारी): ३,२३,००० रुपये
आज (२२ जानेवारी): ३,०८,००० रुपये
घसरण: १५,००० रुपये
एकाच दिवसात चांदीत १५ हजारांची आणि सोन्यात साडेतीन हजारांची घट झाल्याने गुंतवणूकदारांचे मात्र धाबे दणाणले आहेत. ज्यांनी कालच्या उच्चांकी दरात खरेदी केली होती, त्यांना आजच्या घसरणीचा मोठा फटका बसला आहे. मात्र, लग्नासाठी दागिने घडवणाऱ्या ग्राहकांसाठी ही 'संधी' असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.