

जळगाव : राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी यंदाची दिवाळी एक वेगळ्या आणि भावनिक पद्धतीने साजरी केली. त्यांनी यावल तालुक्यातील दुर्गम बारी पाडा या आदिवासी वस्तीवर जाऊन तेथील बांधवांसोबत दिवाळीचा आनंद अनुभवला. यावेळी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वस्ती उजळून निघाल्याचे आनंदी चित्र दिसून आले.
आपुलकीची दिवाळी
या भेटीदरम्यान गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधवांच्या घराघरात भेट देत आदिवासींची पारंपरिक ठेचा-भाकरीचा आस्वाद घेतला. आदिवासी बांधवांसोबत जमिनीवरच भारतीय बैठक करत ग्रामीण चुलीवर शिजवलेल्या भाकरीचा आणि ठेचा चाखत असतांना त्यांनी आदिवासी संस्कृतीशी आपलेपणाने एकरूप होत भावना व्यक्त करत सांगितले की, 'ही खरी आपुलकीची दिवाळी आहे.'
गिरीश महाजन म्हणाले,
'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा किरण पोहोचवत आहे. दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे प्रत्येक घराघरात प्रकाश पोहोचवणे आणि आम्ही तेच करत आहोत.'
या वेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, मुख्यमंत्री सौर कृषि योजना, जलयुक्त शिवार अभियान आणि गृहनिर्माण व सामाजिक कल्याण योजना यांचा उल्लेख करत सांगितले की, या उपक्रमांमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागात विकासाची गंगा वाहू लागली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी देखील भावनिक होत कृतज्ञता व्यक्त केल्या,
'गिरीशभाऊ आमच्या सारख्या दुर्गम भागात येऊन तुम्ही आमच्यासोबत दिवाळी साजरी केली, आमच्यासोबत एका पंगतीत बसून जेवण केले, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील'
या कार्यक्रमाला आमदार अमोल जावळे, माजी नगराध्यक्षा साधना महाजन, केतकी पाटील, नंदू महाजन, डॉ. फेगडे, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, अरविंद देशमुख, उमेश फेगडे, सागर कोळी, अतुल भालेराव, रवींद्र सूर्यभान पाटील, उज्जैनसिंग राजपूत तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी बारी पाडा आणि लगतच्या गावांना दत्तक घेतल्याची घोषणा केली तसेच या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
संवेदनशील आणि प्रेरणादायी उपक्रमामुळे गिरीश महाजन यांचे कार्य हे केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता जनसेवा, आत्मीयता आणि संवेदनशीलतेचे प्रतीक ठरले आहे. आदिवासी समाजासोबत साजरी केलेली ही दिवाळी खर्या अर्थाने 'विकास आणि मानवतेचा उत्सव' ठरली आहे.