

जळगाव : चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव देशमुख (वय अंदाजे ६० वर्षे) यांचे आज, मंगळवार (दि.21) रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने चाळीसगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून अल्पशा आजाराने त्रस्त होते. मंगळवार (दि.21) रोजी दुपारी आज सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. ही बातमी समजताच चाळीसगाव व परिसरात शोककळा पसरली आहे.
राजकीय आणि सामाजिक योगदान
राजीव देशमुख यांनी २००९ ते २०१४ या काळात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्य केले. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे साहेबराव घोडे यांचा पराभव केला होता.
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्येही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली होती, परंतु अनुक्रमे उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला.
ते जळगाव जिल्हा बँकेचे माजी संचालक देखील होते. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ते नेहमीच आवाज उठवत असत. राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना ग्रामीण भागात मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
राजकीय परंपरा आणि कुटुंबीय पार्श्वभूमी
राजीव देशमुख यांचे वडील अनिल देशमुख हे चाळीसगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष होते, तर काका प्रदीप देशमुख हे सध्या जळगाव जिल्हा बँकेचे संचालक आहेत. देशमुख कुटुंबाचा चाळीसगावच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे.
देशमुख यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज मंगळवार (दि.21) रोजी संध्याकाळी चाळीसगाव येथे होणार आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.